तापोळा–अहिर केबल स्टे पूल पूर्णत्वास; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी


महत्वकांक्षी तापोळा–अहिर

केबल स्टे पूल पूर्णत्वाकडे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी तापोळा ते अहिर केबल स्टे पूलाचे काम पूर्णत्वास आले असून आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत पुलाची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.

या पुलामुळे तापोळा परिसरासह दुर्गम भागातील नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. तसेच पर्यटन विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोयना बॅकवॉटर परिसरातील हा पूल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आला असून स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वाहतूक सुविधांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तापोळा – अहिर केबल स्टे पूलामुळे परिसरातील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होणार असून पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होणार आहे.

पूर्वी तापोळा ते अहिर परिसरातील नागरिकांना जलमार्ग अथवा मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत होत्या. नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक केबल स्टे पुलामुळे हा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार आहे.

या पुलामुळे तापोळा परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून हॉटेल, बोटिंग, कृषी पर्यटन, स्थानिक रोजगार आणि व्यापाराला फायदा होणार आहे. शिवसागर जलाशय, बोटिंग, निसर्ग पर्यटन आणि साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या तापोळा परिसरात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

स्थानिक नागरिकांच्या मते, हा पूल केवळ वाहतुकीचा दुवा नसून ग्रामीण भागाच्या विकासाचा नवा मार्ग ठरणार आहे. शाळा, आरोग्य सेवा, बाजारपेठ आणि पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे आता अधिक सोपे होणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीतही या पुलाचा मोठा उपयोग होणार आहे.

निसर्गरम्य डोंगररांगा आणि शिवसागर जलाशयाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेला हा केबल स्टे पूल पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र ठरणार असून भविष्यात तापोळा परिसर महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments