सातारा पोलिसांची सतर्कता;
बालविवाह रोखण्यात यश
कोरेगाव तालुक्यात संयुक्त पथकाची कारवाई
सातारा : सातारा पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे कोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळेत रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. या कारवाईमुळे संबंधित मुलीचे भविष्य सुरक्षित झाले असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. १० मे २०२६ रोजी अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना प्राप्त झाली होती. या माहितीची तात्काळ दखल घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन, महिला व बाल विकास विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी भेट दिली.
तपासणीदरम्यान संबंधित मुलगी कायदेशीर विवाह वयापेक्षा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पालक व नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत बालविवाह हा दंडनीय गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली. तसेच बालविवाहामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याबाबत सविस्तर समुपदेशन करण्यात आले.
प्रशासनाच्या समुपदेशनानंतर संबंधित कुटुंबीयांनी विवाह थांबविण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे नियोजित बालविवाह रोखण्यात यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत API राजेश माने, पोलीस हवालदार मुनीर मुल्ला, महिला पोलीस क्रांती जाधव, भरोसा सेलच्या प्रियांका देशमुख, कोरेगाव पोलीस ठाण्याचे PSI जगदाळे, महिला पोलीस हवालदार पाचांगणे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय शिंदे, महिला व बाल विकास विभागाच्या सुजाता शिंदे, चाईल्ड लाईन प्रतिनिधी वैभव इंगवले तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
दरम्यान, नागरिकांनी बालविवाहासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस प्रशासन किंवा चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!