विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक


विनापरवाना पिस्तूल

बाळगणाऱ्या तरुणाला अटक

शिरवळ पोलिसांची कारवाई, देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

सातारा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सातारा जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान शिरवळ पोलिसांनी विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याच्याविरोधात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भुईंज व शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून अवैध शस्त्रांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलिसांकडून विशेष शोध मोहीम सुरू होती.

दरम्यान, दि. ८ मे २०२६ रोजी शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीकडे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने संबंधित आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले.

याप्रकरणी आरोपी तेजस राजेंद्र मोटे (वय २०, रा. धनगरवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १६८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय हत्यार अधिनियम १९५९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून न्यायालयाने त्याला १२ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, सतीश आंदेळवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास यादव तसेच पोलीस कर्मचारी सचिन वीर, सुरज चव्हाण, बारोटे, मोरे, अरविंद बागडे, भाऊसाहेब दिघे आणि अभय नेवसे यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments