दरोड्याच्या गुन्ह्यातील ७ आरोपी ४८ तासांत जेरबंद


दरोड्याच्या गुन्ह्यातील

७ आरोपी ४८ तासांत जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिसांची संयुक्त धडाकेबाज कारवाई

सातारा : म्हसवड पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या संयुक्त पथकाने दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत सात आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे मान तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या जलद तपासाचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील कुरणेवाडी (ता. मान) येथील मिसाळ वस्तीमध्ये प्रल्हाद मिसाळ (वय ६५) व त्यांची पत्नी सुलबाई मिसाळ (वय ६२) हे शेतातील घरात वास्तव्यास आहेत. दि. ४ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास अनोळखी आरोपींनी घराच्या सोप्याचे ग्रील उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर वृद्ध दांपत्याला दाबून धरत मारहाण करण्यात आली व चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ₹७२,२०० किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्रल्हाद ज्ञानू मिसाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या सूचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली.

म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली. आरोपींनी घटनास्थळी कोणताही पुरावा न ठेवल्याने तपास मोठे आव्हान ठरत होता. मात्र गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात यश आले.

या प्रकरणी दादा अण्णा बुधावले (वय २०), संजय अण्णा बुधावले (वय २३), महादेव अण्णा बुधावले (वय २२), हर्षद युवराज बुधावले (वय १९), ऋतिक भारत बनसोडे (वय २०) तसेच दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपी वरकुटे मलवडी (ता. मान, जि. सातारा) येथील रहिवासी आहेत.

सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ₹६५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल जप्त केली आहे. आरोपींना दि. ९ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करीत आहेत.

या कारवाईमध्ये म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे तसेच शहाजी वाघमारे, जगन्नाथ लुबाळ, रूपाली फडतरे, धीरज कवडे, नवनाथ शिरकुळे, सतीश जाधव, हर्षद जाधव, रवी गुरव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्यासह शिवाजी गुरव, अमोल माने, सनी आवटे, अजय जाधव, अमित माने, प्रवीण पवार, ओंकार यादव व संभाजी साळुंखे यांनी सहभाग घेतला.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments