जनसंघाने काँग्रेस, कम्युनिस्ट व समाजवादी विचारधारेंशी लढत आपले अस्तित्व निर्माण केले : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले


जनसंघाने काँग्रेस, कम्युनिस्ट व

समाजवादी विचारधारेंशी लढत

आपले अस्तित्व निर्माण केले

: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

साताऱ्यात भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त मेळावा उत्साहात

सातारा : भाजपा स्थापना दिनानिमित्ताने महाराष्ट्रातील १९५१ ते १९८०, १९८० ते २०२६ या जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीच्या ७५ वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेणे संयुक्तिक ठरेल. १९५१ ते १९७७ या काळात महाराष्ट्रात जनसंघाचे अस्तित्व प्रचंड संघर्षानंतरही लक्षणीय म्हणावे असे नव्हते. त्या काळातील सामाजिक परिस्थितीमुळे आणि काँग्रेस कम्युनिस्ट, समाजवादी विचारधारेतील प्रसारमाध्यमे, विचारवंत-शिक्षितांच्या व्यवस्थेकडून जनसंघावर हिंदुत्वाचा शिक्का मारून हा पक्ष प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत अस्पृश्य ठरेल, अशी काळजी घेतली गेली. भटजी आणि शेठजींचा पक्ष अशा शब्दात हेटाळणी होऊनही जनसंघाने काँग्रेस, कम्युनिस्ट आणि समाजवादी विचारधारेंशी लढत देत आपले अस्तित्व निर्माण केले, असे प्रतिपादन नामदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.


भारतीय जनता पार्टीच्या ४७व्या स्थापना दिनानिमित्ताने साताऱ्यात हॉटेल लेक व्ह्यू येथे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला नामदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, भारतीय जनता पार्टी स्थापनादिन अभियान महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक विक्रम पावसकर, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, सातारा जिल्हा समन्वयक सुनील काटकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैया भोसले, सातारा नगरपालिका अध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर, अविनाश कदम , जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती तेजस्विनी कदम, समाज कल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, सातारा पंचायत समिती सभापती महेश गाडे, कराड पंचायत समिती सभापती नंदा यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.


सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याचे पूजन करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार अनिरुद्ध गाढवे, जयकुमार शिंदे, भरत मुळे, नगरसेविका आशा पंडित, नगरसेविका सिद्धी पवार, सुनिता शहा यांनी उपस्थित मान्यवरांना "संघर्ष यात्री" हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्षांचा प्रवास आणि कार्य सांगणारे पुस्तक भेट देऊन सत्कार केला. भाजपा स्थापना दिन अभियानचे जिल्हा संयोजक जयकुमार शिंदे यांनी प्रास्तविक करताना, कार्यक्रमाचे नियोजन कसे करायचे आहे याची माहिती दिली. या मेळाव्यात पूर्व कार्यकर्ते आफळे काका, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, नगरसेवक शंकर माळवदे, श्रीमती प्रभावती दरेकर, किशोर गोडबोले यांचा मान्यवरांच्या हस्ते पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.


नामदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सर्वप्रथम "अंत्योदय" हा विचार घेऊन " राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, नंतर स्वतः" या तत्वावर काम करत समाजामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टीचा जनसंघापासूनचा इतिहास आणि विकास उलगडताना त्यांनी सांगितले, की ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्यावेळच्या जनता पक्षातून बाहेर पडत भारतीय जनता पार्टीच्या रूपाने नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या  नेत्यांनी घेतला. 1१९७७ मध्ये आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर संघटना काँग्रेस, भारतीय लोकदल, सोशलिस्ट पार्टी (समाजवादी) यांच्या बरोबरीने जनसंघाने जनता पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला. जनता पक्षाने इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा पराभव करत केंद्रातील सत्ता मिळवली. जनता पक्षातील जनसंघाच्या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवू नयेत, अशी मागणी जनता पक्षातील समाजवादी विचाराच्या मंडळींनी केली. ही मागणी अमान्य करत अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी या मंडळींनी जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमची मातृसंस्था असून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारधारेवर आम्ही ठाम आहोत, अशी भूमिका घेत अटलजी आणि अडवाणी यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्याचा निर्णय जाहीर केला. १९८० ते २०२६ या ४६ वर्षाच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीने अनेक खाचखळगे अनुभवले, टिंगलटवाळी सहन केली. मात्र, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्ष वाढवताना पक्षाच्या विचारधारेशी कधीच तडजोड केली नाही. भारतीय जनता पार्टीची स्थापना होत असताना भारतीय लोकदल, पूर्वाश्रमीच्या समाजवादी विचारधारेच्या मंडळींचा जनता पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष हे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला आव्हान देत होते. यातील जनता पार्टी आणि लोकदलाने जनता दलाच्या रूपाने १९८० च्या उत्तरार्धात आणि १९९० च्या पूर्वार्धात राष्ट्रीय राजकारणात लक्षणीय स्थान मिळवले होते. जनता दलाने काही काळ आघाडीच्या रूपाने केंद्रातील सत्ताही काही काळ उपभोगली. मात्र, हे सर्व पक्ष आता राष्ट्रीय राजकारणात नगण्य ठरले आहेत. समाजावादी विचारधारेचे समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल हे दोन पक्ष उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आपल्या अस्तित्व राखून आहेत. मात्र हे दोन्ही पक्ष एका कुटुंबापुरते मर्यादित झाले आहेत. कम्युनिस्ट पक्षाचे केरळ बाहेर अस्तित्वही दिसत नाही. भारतीय जनता पार्टी मात्र या ४६ वर्षात सातत्याने वाढत जाणारा पक्ष ठरला आहे. याचे कारण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने प्रखर राष्ट्रवादाची विचारसरणी सत्तेसाठी कधीच सोडली नाही.

शिवेंद्रराजे म्हणाले, १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना झाली. त्यानंतर काही महिन्यांतच म्हणजे १९५२ मध्ये स्वतंत्र भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत जनसंघाने ९४ उमेदवार उभे केले होते. अवघ्या वर्षभरापूर्वी स्थापना होऊनही जनसंघाने त्या निवडणुकीत ३.१ टक्के मते मिळवत ३ जागा मिळवल्या होत्या. १९६७ साली झालेल्या निवडणुकीत जनसंघाचा मतांचा टक्का ९.३ पर्यंत वाढला होता आणि जागांची संख्या ३५ पर्यंत गेली होती. १९८० मध्ये भाजपाची स्थापना होत असताना राष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप आणखी बदलले होते. त्या स्थितीत अटलजींनी पक्षाची धुरा मोठ्या समर्थपणे सांभाळत पक्षाला महत्वपूर्ण स्थान मिळवून देण्याकडे वाटचाल सुरू केली होती. मात्र १९८४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याने राजकारणाचे सर्व संदर्भ पूर्णपणे बदलून गेले. १९८४च्या अखेरीस झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे काँग्रेसच्या बाजूने सहानुभूतीची प्रचंड लाट निर्माण झाली. या लाटेत भाजपासह सर्व विरोधी पक्षांचा धुव्वा उडाला. अटलजींसह भाजपाच्या अनेक प्रमुख नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यावेळी भाजपाचे अवघे दोन उमेदवार लोकसभेवर निवडून आले होते. यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपा कार्यकर्त्यांना, नेत्यांना टिंगलटवाळीचा, कुचेष्टेचा सामना करावा लागत होता. त्याही स्थितीत आपल्या नेतृत्वाने हार मानली नाही. आपले नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रीय राजकारणात चिकाटीने काँग्रेसविरोधात लढत राहिले. १९८४ साली भाजपाला ७.४ टक्के मते मिळाली होती. अवघ्या ५ वर्षात म्हणजे १९८९ च्या निवडणुकीत भाजपाच्या जागा २ वरून ८५पर्यंत पोहचल्या. भाजपाची मतांची टक्केवारी ११ टक्क्यांपेक्षा अधिक झाली. राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाजपाने सत्ता मिळवली. त्यावेळी केंद्रात सत्तेत असलेल्या जनता दलाची अनेक शकले उडाली. त्यामुळे काँग्रेसला पर्याय म्हणून भाजपा राष्ट्रीय राजकारणात स्थिरावली. १९९१, १९९६ अशा दोन्ही निवडणुकीत भाजपा शंभरापार गेली. १९९८ मध्ये विविध प्रादेशिक पक्षांशी आघाडी करत भाजपाने केंद्रात सरकार स्थापना केले. हे सरकार फार काळ टिकले नाही. मात्र भाजपाने याच राजकीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून १९९९ मध्ये केंद्राची सत्ता पुन्हा मिळवली. २००४ ते २०१४ या काळात भाजपा केंद्रातील सत्तेबाहेर राहिली. मात्र, भाजपाच्या जागा १००च्या खाली कधीच गेल्या नाहीत. २०१४ नंतरचा इतिहास आपणां सर्वांना ठाऊक आहेच. त्यामुळे तो पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम, गुजरात, ओडिशा, त्रिपुरा, दिल्ली, उत्तराखंड, हरयाणा, या राज्यात भाजपा  स्वबळावर सत्तेत आहे. महाराष्ट्र, बिहार या मोठ्या राज्यांमध्ये भाजपा मित्रपक्षांच्या साथीने सत्तेत आहे. अनेक वर्षे देशाची आणि अनेक राज्यांची सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसला सलग तीन लोकसभा निवडणुकीमध्ये १०० जागाही मिळवता आल्या नाहीत, असेही शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.


ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, भारतीय जनता पार्टीने १९८० नंतरच्या आपल्या वाटचालीत आपल्या अस्तित्वासाठी प्रखर संघर्ष केला. या संघर्षात विचारधारेशी तडजोड करण्याचे पातक पक्ष नेतृत्वाने कधीच केले नाही. १९८० मध्ये ‘कमळ’ या चिन्हावर पहिली विधानसभा निवडणूक लढवणार्‍या भारतीय जनता पार्टीने १४ जागा मिळवल्या. १९८५ मध्ये या जागा १६ वर पोहचल्या. १९८५ ते १९९० ही ५ वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने संक्रमणाची होती. शरद पवार यांनी १९८०पासून काँग्रेस विरोधातील राजकारणाचा अवकाश व्यापला होता. मात्र, स्वबळावर सत्ता मिळवता येत नाही, हे लक्षात आल्यावर पवार साहेबांनी समाजवादी काँग्रेसचा गाशा गुंडाळला आणि काँग्रेसच्या वळचणीला जावून बसणे पसंत केले. या सुमारास रामजन्मभूमी आंदोलनामुळे हिंदुत्वाचे वारे वाहू लागले होते. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला. याच विचारधारेच्या आधारावर भाजपा आणि शिवसेना यांची युती झाली. शरद पवार काँग्रेसमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्रात विरोधी पक्ष संपून जातील, हे राजकीय विश्‍लेषकांचे भाकीत भाजपा-शिवसेना युतीने साफ खोटे ठरविले. १९९०च्या निवडणुकीत भाजपाने ४२ जागा मिळवल्या. १९९५ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने १३५ जागा जिंकत राज्याची सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपाच्या जागा ६५पर्यंत जाऊन पोहचल्या. १९८५ ते १९९५ ही भाजपाची १० वर्षाची वाटचाल अनेक अर्थाने उल्लेखनीय ठरली. शेटजी-भटजींचा पक्ष हा आपल्यावरील अनेक वर्षाचा टिळा पुसून भारतीय जनता पार्टीने विविध जाती समुहांची गणिते जमवून सामाजिक जुळणी केली. ही सामाजिक जुळणी पक्षाच्या वाढीस प्रामुख्याने कारणीभूत ठरली.

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या पक्षाचे वर्णन अन्य पक्षांपेक्षा वेगळा असे केले होते. आपल्या विचारधारेशी कदापि तडजोड न करता भाजपा गेल्या ४६ वर्षात कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाच्या बळावर केंद्राची सत्ता सलग तिसर्‍यांदा मिळवली आहे. ‘मंदिर वहीं बनाएंगे’ची आपली घोषणा प्रत्यक्षात आली आहे. काश्मीरचे ३७०वे कलमही भाजपा सरकारने रद्द केले आहे. आता फक्त समान नागरी कायद्याचा मुद्दा मार्गी लागण्याचे बाकी आहे. ज्या मुद्यांच्या आधारे आपण राष्ट्रवादाची विचारधारा सातत्याने मांडली. त्या मुद्यांची आपण तडही लावली आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टी अन्य पक्षांपेक्षा वेगळा ठरला आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधोरेखित केले.


जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले मार्गदर्शन करताना म्हणाले, स्थापना दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये ६ ते १५ एप्रिलपर्यंतच्या कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली. सर्वांच्या घरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावावा. या झेंड्यासोबत आपल्या परिवाराचा फोटो काढून तो सोशल मीडियावर अपलोड करावा. त्याचप्रमाणे पुढील नियोजनामध्ये ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त सर्व बूथवर प्रतिभा पूजन करावे, १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व बूथ वर प्रतिमा पूजन करावे, पुतळ्यांची स्वच्छता करावी आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करून जयंती साजरी करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केले. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी शहरी भागात वस्तीवर आणि ग्रामीण भागात प्रत्येक गावात प्रवास करावा, तेथील नागरिकांना भारतीय जनता पार्टीचा इतिहास आणि आत्ताची स्थिती त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनाची पूर्ण माहिती सांगावी. त्यांच्यात भारतीय जनता पार्टीबद्दल विश्वास जागवावा आणि "घर घर भाजपा" हे आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांनी केली.

या मेळाव्यासाठी सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, आघाड्या मोर्चे यांचे प्रदेश, जिल्हा, मंडल पदाधिकारी , जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेविका, नगरसेवक, बूथ अध्यक्ष, बूथ सदस्य, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments