प्रगणक, पर्यवेक्षकांनी जनगणनेचे
काम प्रामाणिकपणे व सचोटीने
करावे : जिल्हाधिकारी
संतोष पाटील
जावळी पंचायत समितीत जनगणना २०२७ चे प्रशिक्षण सुरू; जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
मेढा : देशाच्या संसाधन नियोजन व विकास प्रक्रिया जनगणनेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्त्वाचे राष्ट्रीय काम करण्याची संधी प्रगणक आणि पर्यवेक्षकांना मिळत आहे. जनगणनेचे कामकाज प्रामाणिकपणे व सचोटीने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
येणाऱ्या काळात प्रगणक घरोघरी आल्यानंतर सर्व नागरिकांनी अचूक माहिती सांगावी. ही माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार असून, त्याचा उपयोग विकास योजना व धोरणे ठरवताना शासनाला होणार आहे. या सर्व प्रक्रियेकडे कर्मचारी तसेच नागरिक यांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून निःसंशयपणे अचूक माहिती नमूद करावी, असे आवाहनही पाटील यांनी नागरिकांना केले.
पाटील म्हणाले, जगातील सर्वात प्रतिष्ठित, सर्वात मोठ्या प्रशासकीय आणि सांख्यिकीय उपक्रम जनगणना 2027 आहे. भारतामध्ये जनगणना 1872 पासून केली जात आहे. येणारी जनगणना ही देशातील १६ वी जनगणना आहे. राष्ट्राच्या नियोजन आणि विकासासाठी आवश्यक असलेली माहिती या जनगणनेत संकलित केली जाते. ही जनगणना दोन टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना होणार आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्षात लोकसंख्या गणना होणार आहे. येणाऱ्या 16 मे 2026 पासून 14 जून 2026 पर्यंत तीस दिवसात पहिल्या टप्प्यातील घर गणनेची प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी 2027 मध्ये होणार आहे. सदर प्रक्रियेसाठी प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णतः डिजिटल असून मोबाईल अॅपद्वारे माहिती संकलित केली जाईल. तसेच सर्व नागरिकांना 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्वगणना ही करता येईल.
जावली तालुक्यात एकूण 246 घर यादी गट तयार करण्यात आले असून, एकूण 237 प्रगणकांची, 45 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याच सोबत 4 फील्ड ट्रेनर्स ही नियुक्ती करण्यात आली आहेत. जनगणनेची सर्व प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांचे तीनदिवसीय प्रशिक्षण घेण्याचे आहे. सदर प्रशिक्षण फार्मसी कॉलेज मेढा या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली. सदर क्षेत्रभेटीमध्ये जिल्हाधिकारी यांनी प्रशिक्षण सत्रात बसून सत्राची गुणवत्ता पाहणी केली. तदनंतर माननीय जिल्हाधिकारी यांनी सर्व प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याशी संवाद साधला.
यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार तथा चार्ज अधिकारी प्रवीण मुदगुल, निवासी नायब तहसीलदार सुनील मुनाळे, महसूल नायब तहसीलदार निसार शेख, मुख्याधिकारी, मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सौरभ ठुबे,भरत पवार तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व तज्ञ प्रशिक्षक, प्रगणक, पर्यवेक्षक उपस्थित होते.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!