ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना ३४वा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार


ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना

३४वा फुले आंबेडकर

साहित्य पुरस्कार

भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष लक्ष्मण माने यांची माहिती 

सातारा : भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना ३४वा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार, शिवलाल जाधव यांना जीवन गौरव पुरस्कार, गणेश काळे यांना विशेष जीवगौरव पुरस्कार तर डॉ. प्रकाश जाधव यांना भटक्या विमुक्ताचे नेते यल्लाप्पा वैदू यांना युवा साहित्य पुरस्कार संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष उपराकार माजी आमदार लक्ष्मण माने यांनी जाहीर केले.

लक्ष्मण माने यांनी सांगितले की, मराठीतील जेष्ठ पत्रकार मा. राजू परुळेकर यांना 2026-27 चा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यापूर्वी हा पुरस्कार प्रा. रा. ग. जाधव, कवी नारायण सुर्वे, डॉ. भालचंद्र फडके, डॉ. य. दी फडके, प्रा. मे. पु. रेगे, प्रा.रावसाहेब कसबे, डॉ. जनार्धन वाघमारे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. रुपा बोधी, डॉ. बाबा आढाव, डॉ. अनिल अवचट, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. प्रा. प्रदीप आगलावे, डॉ. विलास वाघ, डॉ. फकरुद्दीन बेन्नुर, कवि अर्जन डांगळे, पद्मश्री नामदेव ढसाळ, पत्रकार अरुण खोरे, पत्रकार सदा डुम्बरे, पत्रकार निखलजी वागळे, खा. कुमार केतकर, प्राचार्य नागोराव कुंभार, डॉ. सुखदेव थोरात इत्यादी मान्यवर साहित्यिकांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दि. ९ मे २०२६ रोजी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते शारदाबाई पवार आश्रमशाळा, जकातवाडी, सातारा येथे दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. यावर्षीचा विशेष जीवन गौरव पुरस्कार पारधी समाजाचे नेते व भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश काळे, कोल्हापूर यांना तसेच जीवनगौरव पुरस्कार भटक्या विमुक्त संघटनेचे नेते डॉ. शिवलाल जाधव, पुणे (मुंढवा) यांना तर यलाप्पा वैदू युवा साहित्यपुरस्कार प्रा. डॉ. प्रकाश जाधव, लातूर (निलंगा) यांना घोषित करण्यात आलेला आहे. या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने, सरचिटणीस नारायण जावलीकर, उपाध्यक्ष मच्छिंद्रनाथ जाधव व खजिनदार हरिदास जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments