बांधकाम विभागाने
विकासकामांच्या दर्जाबाबत
तडजोड करू नये
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले; छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक
सातारा : सार्वजनिक बांधकाम विभाग हा राज्याच्या विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारा विभाग आहे. या विभागामार्फत विविध शासकीय कार्यालये, इमारती, रस्ते व पूल आदी विकासकामे केली जातात. या सर्व पायाभूत सुविधा असून या कामांची गुणवत्ता व दर्जा याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणाऱ्या विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड करू नये, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली छ. संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागावाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधिक्षक अभियंता एस. एस. भगत, अधिक्षक अभियंता (विद्युत) श्रीमती समिधा सुरवसे, अधिक्षक अभियंता एन. व्ही. भंडे, विद्युत मंडळाचे अधिक्षक अभियंता दयानंद म्हात्रे, अधिक्षक अभियंता श्रीमती विभावरी वैद्य यांच्यासह विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान अधिनस्त कार्यालये, कार्यक्षेत्र, रस्ते व पूल यांची सांख्यिकी तसेच पुलांच्या तपशीलवार माहितीचे सादरीकरण करण्यात आले. २०२२ सालापासून आजपर्यंत पूर्ण झालेली कामे, नाबार्ड अंतर्गत पूर्ण झालेले प्रकल्प तसेच हायब्रीड अॅन्युइटी (Hybrid Annuity) अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते व पूल प्रकल्पांची माहिती घेण्यात आली. २०२६ च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या कामांचा आढावा घेऊन त्यांच्या अंमलबजावणीस गती देण्याच्या सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रगतीपथावरील इमारतीची कामे, जिल्ह्यातील शासकीय इमारती तसेच रुग्णालयीन इमारतींच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष देण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. बीड येथील जिल्हा रुग्णालय व २०० खाटांच्या महिला रुग्णालयाच्या इमारतीच्या गुणवत्तेबाबतही माहिती घेण्यात आली.
जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती, प्रलंबित कामे तसेच पैठण व शिरूर परिसरातील प्रकल्पांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्या. नवीन कामांबरोबरच जुन्या कामांची दुरुस्ती करून नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. तसेच वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांची नियमित निगा राखली जाते का याची माहिती घेऊन विश्रामगृह व शासकीय परिसरातील वृक्ष लागवडीची देखभाल सुनिश्चित करण्याचे आदेश ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना दिले. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपापली कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि जबाबदारीने पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!