माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
शिवसेना नगराध्यक्षपदाबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे संकेत
कराड : नगरपालिका निवडणुकीत आज शिवसेना व यशवंत विकास आघाडीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, यशवंत विकास आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले, “महायुतीबाबत चर्चा सुरू आहेत. दोन दिवसांत आम्ही स्वबळावर लढणार की मित्रपक्षांसोबत, हे अधिकृतपणे जाहीर करू. शिवसेना व यशवंत विकास आघाडीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारही आज-उद्या अर्ज दाखल करतील.”
कराड नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. घटकपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) ने चार दिवसांपूर्वीच राजेंद्रसिंह यादव यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली होती. त्यामुळे शिवसेनेने नगराध्यक्ष पदावर कोणतीही तडजोड होणार नसल्याचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनीदेखील “नगराध्यक्ष पदाबाबत कोणतीही तडजोड नाही” असा ठाम दावा व्यक्त केला होता. तरीही भाजपकडून महायुतीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात होते. यावर आज भाष्य करताना यादव म्हणाले, “चर्चा सुरू आहे. दोन दिवसात महायुतीबाबतची आमची अधिकृत भूमिका स्पष्ट करू.”
यादव यांनी कराडच्या दीर्घकालीन विकास आराखड्याबाबतही महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराजे देसाई व शिवसेना संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनानुसार अर्ज दाखल केला आहे. 2056 साली कराडची अंदाजे 3 लाख लोकसंख्या गृहीत धरून शहराचा मायक्रो विकास व्हिजन आम्ही मतदारांसमोर ठेवणार आहोत.”

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!