सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबामधील वाघीण चंदा दाखल
सातारा : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC) यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) व पेंच व्याघ्र प्रकल्प (PTR) येथील तीन नर व पाच मादी अशा एकूण आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR) येथे स्थानांतरण करण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र वन विभागाने “ऑपरेशन तारा” या राज्यातील दीर्घकालीन व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील T20-S-2 या तरुण वाघिणीचे यशस्वीरीत्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण केले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम भारतीय वन्यजीव संस्था (WII) यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
सुमारे तीन वर्षांची ही वाघीण NTCA च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांनुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून सुरक्षितरीत्या पकडण्यात आली. तिला योग्य पशुवैद्यकीय उपचार देऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे समर्पित वन्यजीव वाहतुकीच्या वाहनातून स्थलांतरित करण्यात आले. सध्या तिला सोनारली येथील एनक्लोजरमध्ये “सॉफ्ट रिलीज” पद्धतीने सोडण्यात आले असून, पुढील टप्प्यांत वनात सोडण्यापूर्वी तिचे acclimatization व निरीक्षण करण्यात येणार आहे.
ताडोबा व सह्याद्री येथील पथकांनी केलेल्या समन्वित, वैज्ञानिक आणि जबाबदार कार्यामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सक्षम व्याघ्र अधिवास निर्माण करण्यासाठी वन विभाग सातत्यपूर्ण निरीक्षण, अधिवास सुधारणा व वैज्ञानिक पद्धतींच्या अंमलबजावणीस वचनबद्ध आहे.
सदर ऑपरेशन तारासाठी क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, विभागीय वनाधिकारी स्न्हेलता पाटील , सहायक वनसंरक्षक संदेश पाटील , सहायक वनसंरक्षक बाबासाहेब हाके, वनक्षेत्रपाल चांदोली ऋषीकेश पाटील , वनक्षेत्रपाल आंबा प्रदीप कोकितकर , वनक्षेत्रपाल ढेबेवाडी किरण माने , वनक्षेत्रपाल फिरते पथक संग्राम गोडसे , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे , आकाश पाटील वन्यजीव संशोधक व सर्व स्टाफ यांनी मोलाची भूमिका फार पाडली .
वनक्षेत्रपाल फिरते पथक संग्राम गोडसे व आकाश पाटील वन्यजीव संशोधक यांनी वाघीण निवड ते वाघीण पकडून ताडोबा ते चांदोलीपर्यंत सुरक्षित आणण्याची अत्यंत मोलाची भूमिका पार पाडली .
बुधवार, दि. १२.११.२०२५ रोजी दुपारी ४ वाजता वाघीण पकडण्याची मोहीम तोडोबा येथे चालू झाली. सदर वाघीण ५ वाजता पकडून पिंजर्यात बंदिस्त करण्यात आली. कागद पत्र, वैद्यकीय सर्व तपासण्या , फिटनेस पाहून रात्री १० वाजता कराड च्या दिशेने प्रवास सुरु झाला. शुक्रवारी रात्री १.३० वाजता सर्व टीम वाघीण घेऊन चांदोली येथे दाखल झाली. पुन्हा एखदा वैद्यकीय तपासण्या , फिटनेस पाहून पाहते ३.२० ला वाघीण एनक्लोजरमध्ये “सॉफ्ट रिलीज”करण्यात आले.
जवळपास १००० किमीचे अंतर २७ तास प्रवास करून वाघीण सुरक्षित खास वेगळ्या पिंजर्यातून चांदोली येथे दाखल झाली.
सदर सोडण्यात आलेल्या चंदा वाघिणीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमधील नवीन नाव तारा असे देण्यात आले आहे, तर सांकेतिक क्रमांक STR T 04 असा आहे.
“ऑपरेशन तारा हा सह्याद्रीसाठी ऐतिहासिक पुढचा टप्पा आहे. या वाघिणीच्या सॉफ्ट रिलीजमुळे सह्याद्रीतील वैज्ञानिक पुनर्स्थापना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आमच्या पथकाने ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जबाबदारीने व सुरळीतरीत्या पार पाडली. WII च्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यपूर्ण निरीक्षण करून सह्याद्रीला पुन्हा सक्षम व्याघ्र अधिवास बनवू.”
तुषार चव्हाण
क्षेत्र संचालक – सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
“सह्याद्रीतील व्याघ्र पुनर्स्थापनासाठी हे स्थानांतरण हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. ताडोबा व सह्याद्रीच्या पथकांचे समन्वित, वैज्ञानिक आणि व्यावसायिक कार्य अभिनंदनास पात्र आहे.”
एम. एस. रेड्डी, प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक, महाराष्ट्र राज्य




0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!