राजू शेळके यांना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्यास तरुणास अटक
साताऱ्यात भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण केल्यावरून दोन गटात हमरीतुमरी
सातारा : सातारा पोवई नाका येथील भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गुंडांच्या जागेवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उभारल्याने संतापलेल्या भाईने थेट पोलिसांसमोरच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राजू शेळके यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर रोहित जगन्नाथ नाईक (वय २९, रा. खेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोवई नाका येथील भाजी मंडई मध्ये शेतकऱ्यांना पालिकेच्या वतीने दोन लाईन आरक्षित करण्यात आल्या आहेत. यावर काही गुंडांनी अतिक्रमण केल्याची माहिती शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे दिली होती. त्यानुसार राजू शेळके यांनी पालिकेकडे तक्रार दिल्यानंतर पालिकेचा अतिक्रमण विभाग तसेच पोलिसांसह या ठिकाणी हे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या राजू शेळके यांनाच संबंधित गुंडाकडून जीवे मारण्याची व कापून टाकण्याची धमकी देण्यात आली. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर सुरू असतानाही पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. उठसुट पोलिसांच्या देखत कोण बाया नाचवतो, तर कोण थेट गोळ्या घालण्याची धमकी देतो. त्यामुळे कायद्याचा धाक हा सर्वसामान्य लोकांना दाखवण्यासाठी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, रविवार पेठ येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांच्या जागेवर असणाऱ्या दोन टपऱ्यांची अतिक्रमण काढत असतानाच रोहित नाईक याने वादावादीस सुरुवात केली. यावेळी त्याने गोळ्या घालून जीवे मारू अशी धमकीही दिली. त्याचवेळी दोन गटात जोरदार हमरीतुमरीही झाली. या घटनेचा सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी निषेध केला आहे. शेतकरी संघटना आणि शेतकरी किसान मंचच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वीच पोलिसांनी रोहित नाईक याला ताब्यात घेतले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करत आहेत.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!