वारस नोंदी, एकत्र कुटुंब मॅनेजर संज्ञा कमी करणे व लक्ष्मी मुक्ती योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा : तहसीलदार हनुमंत कोळेकर

 


वारस नोंदी, एकत्र कुटुंब मॅनेजर

संज्ञा कमी करणे व लक्ष्मी मुक्ती

योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा


तहसीलदार हनुमंत कोळेकर यांचे आवाहन


प्रशासनातर्फे 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित


मेढा : वारस नोंदी, एकत्र कुटुंब मॅनेजर संज्ञा कमी करणे व लक्ष्मी मुक्ती योजनेतर्गत शेतजमिनीचे 7/12 सदरी पत्नीचे नाव दाखल करण्यासाठी संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहन जावळीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी केले आहे.


तहसीलदार कोळेकर म्हणाले, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण - 2025 / प्र.क्र. 7 / र. व. का. दि. 13/1/2025 शासन निर्णयान्वये शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्यामधील विषय क्रमांक 2) सुकर जीवनमान (Ease of living) अंतर्गत जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांनी शेतजमिनीचे 7/12 सदरी असलेल्या एकत्र कुटुंब मैनेजर (एकुमें) नोंदी कमी करण्याबाबत मयत खातेदारांचे वारस नोंदी करणे, लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पतीचे खात्यात समाईकात पत्नीचे नाव दाखल करणे इत्यादी कामकाज करण्याबाबत निर्देश दिले आहेत.



एकत्र कुटुंब मॅनेजर ही संज्ञा कमी करण्यासाठी एकत्र कुटुंब मॅनेजर यांचा अर्ज, एकत्र कुटुंब मॅनेजर दाखल झाल्याबाबतचा फेरफार, जमिनीचे 7/12 उतारे इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.


वारस नोंद करण्यासाठी वारसाबाबतचे प्रतिज्ञापत्र, मयत खातेदाराचा मृत्यूचा दाखला, शेतजमिनीचा 7/12, खाते उतारा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.


लक्ष्मी मुक्ती योजनेतंर्गत पत्नीचे नाव 7/12 सदरी दाखल करण्यासाठी 7/12 सदरी नाव दाखल असलेल्या खातेदारांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, जमिनीचे 7/12 व खाते उतारा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.


जावली तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत की, जिल्हाधिकारी सातारा व उपविभागीय अधिकारी सातारा यांनी दिलेल्या निर्देशानुसार वारस नोंदी, एकत्र कुटुंब मॅनेजर संज्ञा कमी करणे व लक्ष्मी मुक्ती योजनेतर्गत शेतजमिनीचे 7/12 सदरी पत्नीचे नाव दाखल करण्यासाठी संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहन जावळीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, नायब तहसीलदार संजय बैलकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments