संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करणार्‍या नराधमांना फाशीची शिक्षा द्या

 


संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करणार्‍या नराधमांना फाशीची शिक्षा द्या

जावळी तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चा काढून निषेध

सातारा : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकाडांतील सहभागी आरोपींनी ज्या पध्दतीने मारहाण केली. त्यांच्या देहाची विटंबना केली हे दाखल केलेल्या आरोपपत्रातील फोटोवरून दिसून येत आहे, याचा निषेध करण्यासाठी जावळी तालुक्यातील मेढा येथील तहसीलदार कार्यालयावर सकल मराठा समाज, आम्ही जावळीकर व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र संघटनांच्या वतीने मूक मोर्चा काढून निषेध केला.

जावळीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर समाजमन हेलावले आहे. या हत्याकाडांतील सहभागी आरोपींनी ज्या पध्दतीने मारहाण केली. त्यांच्या देहाची विटंबना केली हे दाखल केलेल्या आरोपपत्रातील फोटोवरून दिसून येत आहे. यापूर्वीही माध्यमांवर अनेक प्रकारच्या मारहाणीच्या व्हिडिओ व फोटो समाजाने पाहिले आहेत. एखाद्या जनावरालाही अशा पध्दतीने मारले जात नाही, अशा पध्दतीने या सर्व नराधमांनी सरपंच संतोष देशमुख यांना मारलेले आहे. या आरोपींच्या मागे कितीही मोठा हात असला तरी हे आरोपी वाचता कामा नयेत.

या हत्येतील सर्व आरोपी ज्या पध्दतीने वागले त्याचे फोटो, व्हिडिओ काढले त्याचा अर्थ ते इतके निर्ढावलेले आहेत, की त्यांच्या मनात कायद्याची भीती नव्हती असेच दिसून येते. त्यामुळे अशा मस्तवाल, निर्ढावलेल्या गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी.

सरकार पक्षाने निष्णात वकिल उज्ज्वल निकम यांची निवड केली. आपण राज्याचे कणखर गृहमंत्री आहात. आता आपण पोलिस प्रशासनाला सक्त सुचना देवून एकही छोट्यात छोटा पुरावा सुटणार नाही आणि या गुन्ह्यातील एकही आरोपी सबळ पुराव्याअभावी सुटणार याची दक्षता घ्यावी. अमानवी पध्दतीने मारहाण करून हत्या करणार्‍या सर्व आरोपींना व त्यांच्या पाठिराख्यांना फाशीची शिक्षाच व्हायला हवी, हीच समाजभावना आहे.

स्वर्गीय संतोष देशमुख हे गरीब कुटुंबातील असून त्यांचा परिवार उघडा पडता कामा नये, यासाठी सरकारने या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करायला हवी. स्व. देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. आपल्या राज्यात अशा घटना घडतात हेच मुळी संतापजनक व दुर्दैवी आहे.

या घटनेतील सर्व आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी सकल मराठा समाज जावळी तालुका, आम्ही जावळीकर व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र, तालुका जावळीच्या वतीने केली आहे.

Post a Comment

0 Comments