स्वतंत्र ‘मुख्यमंत्री रोजगार
प्रशिक्षण विभाग’ स्थापन
करण्यास मुख्यमंत्र्यांची
सकारात्मकता
कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची माहिती
सातारा : महाराष्ट्रामध्ये अनेक नवनवीन उद्योगधंदे यायला इच्छुक असून, या उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी राज्यात स्वतंत्रपणे ‘मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग’ सुरु करण्याची आवश्यकता आहे. याबाबतची रितसर मागणी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून, त्यांनी या मागणीबाबत सकारात्मकता दर्शविली असल्याचे प्रतिपादन कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज विधानसभेत केले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदन ठरावावर ते बोलत होते.
डॉ. भोसले म्हणाले, की कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी स्वतंत्र ‘मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली असून, या विभागात कामगार मंत्रालयाचे सचिव, कौशल्य विकास विभागाचे सचिव, काही लोकप्रतिनिधी आणि उद्योग जगतातील काही मंडळींचा समावेश असावा. जसे की, हणमंतराव गायकवाड यांनी बी.व्ही.जी.सारखा एक मोठा उद्योग निर्माण करुन हजारो हातांना काम मिळवून दिले आहे. मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की देशाबाहेर मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता आहे. आपल्या देशातल्या अनेक तरूणांना; ज्यांनी शिक्षण घेतले आहे पण त्यांना काही कारणांनी उद्योगाची किंवा नोकरीची संधी मिळत नाही. आपण नेहमी बेरोजगारीवर चर्चा करतो. पण जर अशा पद्धतीचा विभाग विकसित केला तर आपल्या देशात कुशल मनुष्यबळाची निर्मिती करता येईल. त्यामुळे मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी या विभागाची लवकरात लवकर आपण स्थापना करावी. हा विभाग लवकर स्थापन झाल्यास राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळण्याच्या बाबतीमधले एक चांगले प्रगतीचे पाऊल ठरु शकले.
गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती
देशात गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती दिली जात आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर देशातली आणि परदेशातील गुंतवणूक वाढताना दिसत आहे. दावोसमध्ये झालेल्या आर्थिक परिषदेमध्ये १५ लाख ५० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार महाराष्ट्र राज्याने अनेक उद्योजकांबरोबर केले. या करारांनुसार राज्यामध्ये गुंतवणूक झाली तर १० लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्यात एम.आय.डी.सी.ने १०,००० एकर जमीन ही मॉडिफाय करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उर्जा क्षेत्रामध्ये अनेक सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झालेले आहेत. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे. ५५ हजार ९०० मेगावॅट एवढी उर्जेची निर्मिती या सामंजस्य कराराला कार्यान्वित केल्यानंतर होणार आहे आणि त्यामधून जवळजवळ २ लाख ५५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक हीदेखील आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे.
कराडमध्ये महसूल कॉम्पलेक्ससाठी निधी
मी ज्या कराड तालुक्यातून येतो त्या कराड तालुक्याला महसूल कॉम्प्लेक्स निर्माण करण्याची मागणी आम्ही महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. त्यांनी महसूल कॉम्पलेक्सला लागेल तेवढा निधी आम्ही देऊ अशी ग्वाही दिली आहे. त्याचबरोबर तिथे सहकार भवन, कामगार भवन उभारण्याचा आमचा मानस आहे. पंचायत समितीचे सुसज्ज कार्यालयदेखील तिथे असणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आर्थिक महसूल देणारा तालुका म्हणून कराड तालुका ओळखला जातो.
१० लाख तरुणांना प्रशिक्षण
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अभियानाच्या माध्यमातून १ लाख ३२ हजार तरुणांना प्रशिक्षित करण्याचे काम आपण आजपर्यंत केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारचा मानस आहे की १० लाख तरुणांना यावर्षी प्रशिक्षित करण्याचे धोरण निश्चित केले आहे. शक्तीपीठ महामार्गाची निर्मिती सरकारकडून चालू आहे. त्या महामार्गामुळे १२ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे. नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणारे सगळी महत्वाची ठिकाणे जोडण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे आणि त्याचा देखील फायदा निश्चित स्वरूप येणाऱ्या काळामध्ये आपल्याला होताना दिसणार आहे.
नदीकाठच्या शेतकऱ्यांना सोलर पंपबाबत विचार व्हावा
राज्याची कार्बन फुटप्रिंट रेग्युलेट करण्याच्या दृष्टिकोनातून देखील आपल राज्य अग्रेसर आहे. मोठ्या प्रमाणावर सोलर प्रोजेक्ट आपल्या राज्यामध्ये आणण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे. पण मला आपल्याला विनंती करायची आहे, की नदीकाठी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सोलर पंप अडचणीचे ठरत आहेत. बऱ्याच वेळेला नदीकाठी पाण्यामुळे सोलर पंप यशस्वीपणे चालत नाहीत. त्यामुळे त्यांना जुन्या पद्धतीने वीज कनेक्शन देता येते का? याचा विचार व्हावा.
मिनी एमआयडीसीसाठी प्रयत्नशील
ऑटो नेक्स्ट नावाची कंपनी मला भेटली आणि त्यांनी विनंती केली की ईव्ही व्हेइकल करण्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्या. याबाबत मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली असून, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण ईव्ही हब करण्यासाठी थोडी जास्त जागा लागते. त्यामुळे मिनी एमआयडीसी काही मोठ्या तालुक्यांमध्ये करता येतात का, यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!