सातारा : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत पोलिस करमणूक केंद्राच्या अलंकार हॉल येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते झाले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी शेतकरी उपस्थित होते.
सध्याच्या धावपळीच्या युगात लोकांचे जीवनमान तसेच खानपानमुळे आरोग्यवर विपरीत परिणाम होत आहेत. नागरिकांनी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
सदर महोत्सवामध्ये जिल्हाधिकारी पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनीही ज्वारी, लाल व दोडक भात, सेंद्रिय हळद खरेदीही केली. तसेच नागरिकांनी या महोत्सवाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहनही केले.
तर पौष्टिक तृणधान्यांचा आहारामध्ये समावेश केल्यास मधुमेह, बद्धकोष्ठता, आतड्यांच्या आजारास प्रतिबंध होतो. तसेच तृणधान्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदयविकार, ॲनिमिया, उच्च रक्तदाब रोधक मानले जातात, असे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सांगितले.
दि.२१ ते २३ मार्च या कालवधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी सांगितले.
महोत्सवामध्ये शेतातून नुकतीच काढलेली ज्वारी, विविध वाणांचे धान्य त्यामध्ये मालदांडी, सुपर मोती परभणी, मोती फुले रेवती व फुले सूचित्रा, परळी खोऱ्यातील देशी नाचणी, वरी, तांदूळ सोबत, जावळीची नाचणी, मान व खटावची बाजरी, मूग व ज्वारी उपलब्ध आहे. कडधान्यामध्ये जात्यावर दळलेली मूग, उडीद, काळ्या घेवाड्याची डाळ तसेच हिरवा मूग, हुलगे आदी महोत्सवामध्ये विक्रीस उपलब्ध झाले आहे. त्याचबरोबर महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सातारा जिल्ह्यात उत्पादीत झालेली वाईची सेंद्रिय हळद तसेच मिलेटचे विविध पदार्थ, मँगो, स्ट्रॉबेरी विविध प्रकारच्या, नाचणीच्या शेवया, नाचणीचे इडली पीठ, उडीद लाडू, नाचणी अंबिल तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ आदी वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. कोरेगावचा जीआय मानांकन प्राप्त वाघ्या घेवडा, खंडाळा येथील देशी बाजरी, नाचणी, जावळी, पाटणचा देशी इंद्रायणी तांदूळ, फळांचे गाव धुमाळवाडी येथील विविध प्रकारची दर्जेदार फळांचा आस्वाद घेता येणार आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!