अभिजातता तर मिळाली;
भाषेच्या सौष्ठवाचं काय?
आमच्या मराठी मायबोलीला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. मनस्वी कोण आनंदाचा क्षण.. शब्दांमध्ये वर्णन करणेही कठीण. अवघ्या मराठी भाषिक जणांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. अवघ्या मराठी जणांची मने या सुवार्तेने अगदी मोहरून गेलेली आहेत. शासन स्तरावर हा सोहळा जेवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करता येईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा प्रयत्न होत आहे. ही बाब खूपच आनंदाची आहे. गेली काही वर्षे वाचन प्रेरणा दीन, वाचन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन अशा अनेक प्रासंगिक ओचीत्यांनी सजलेले क्षण माय मराठीच्या नशिबी आलेत याचे मनस्वी समाधान आहे. मात्र या निमित्ताने जगभरातील अभिजात भाषा आणि आपली माय मराठी अशी एक साधक बाधक तुलना करून आजच्या जागतिकीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या लाटेवर स्वार झालेल्या जागतिक पटलावर आपण आपले सिंहावलोकन करणे खूप गरजेचे आहे... अभिजाततेचा भाषिक दर्जा मिळणे हा एक भाषेच्या दर्जात्मक सिद्धतेचा भाग झाला. परंतु त्या भाषेचे भाषक म्हणून तटस्थपणे या भाषेचे एकूणच सौष्ठव म्हणजे या भाषेचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, संस्कृतिक आणि जागतिक परिप्रेक्ष्यातून झालेला, होत असलेला आणि भावी काळात व्हायला हवा असा विकास आजवर नेमका किती झाला ? होत आहे ? आणि भावी काळात होईल ? याविषयीचे चिंतन होणे देखील खूप गरजेचे आहे.
कोणतीही भाषा जेव्हा विकसित होते तेव्हा ती फक्त त्या भाषेमध्ये किती प्रमाणात व किती दर्जाचे साहित्य लिहिले गेले आणि जनमानसात ते रुजले या बाबीला महत्त्व आहेच ते कधीच नाकारता येणार नाही मात्र प्रतिभावंतांच्या लेखणीने आणि वक्त्यांच्या वक्तृत्वानेच भाषा समृद्ध होतात हा गैर असलेला समाज आता आपण सोडून द्यायला हवा. युरोपातल्या ज्या ज्या भाषा आज जगावरती राज्य करत आहेत. त्यांच्या एकूणच विकासाची ऐतिहासिक प्रक्रिया पाहिल्यानंतर असे प्रतीत होते की, त्या भाषिक लोकांनी विज्ञान-तंत्रज्ञान, साहित्य, कला, क्रीडा, खगोल, भूगोल, संस्कृती या अनेकविध क्षेत्रांमध्ये नाविन्याचा ध्यास घेत सातत्याने काहीतरी असे शोधून काढले, निर्माण केले, विकसित केले आणि बघता बघता ते तसे शोधण्यातून, निर्माण करण्यातून आणि विकसित करण्यातून ज्या ज्या नवीनतम गोष्टी जगाला मिळाल्या त्या गोष्टींचा आणि साधनांच्या वापराकरता अनेक विविध प्रकारचे नवनवे शब्द, संज्ञा, संकल्पना त्या भाषेत नव्याने भर घालत गेल्या. याच सर्व नव्या गोष्टींनी त्या भाषेला कळत नकळत समृद्ध केले आणि त्या नवीनतम गोष्टी, उपकरणे, संकल्पना जगातील ज्या ज्या नागरिकांना वापरावयाच्या आहेत त्यांना त्यांना ते ते शब्द व गोष्टी जसेच्या तसे आपल्या भाषेत अंगीकाराव्या लागल्या. उदाहरणार्थ वाफेचे इंजिन, डिझेल, वाहने, विद्युत ऊर्जा, पेट्रोल, संगणक, इंटरनेट, टीव्ही, मोबाईल अशा अनेकविध गोष्टी ज्या युरोपीयनांनी शोधून काढल्या त्यांनी त्याला आपल्या भाषेतील नावे दिले आणि जगाने त्याचा जसाच्या तसा स्वीकार केला. म्हणजे कोणत्याही भाषेचे विकसन हे त्या भाषिकांनी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यकर्तुत्वाने ज्या काही कार्यात्मक निर्मितीच्या ओजस्वी टप्प्याला स्पर्श केला त्या टप्प्यापर्यंत ते कळत नकळत आपल्या भाषेलाही घेऊन गेले. साहित्याचे देखील तसेच आहे गटे, डांटे , ऋसो, हेगेल,शेक्सपियर, होमर, लॉक अशी कितीतरी नावे घेता येतील की ज्यांनी निर्माण केलेल्या साहित्याने जगभरातील रसिकांना भुरळ घातली. आता या सर्व निकषांवर माय मराठीच्या आम्हा लेकरांनी गेल्या शंभर वर्षांमध्ये असं काय जगदवेल्हाळ काम केलं की ज्याने माय मराठीचा डंका त्रिखंडात दुमदुमला? दुर्दैवाने याचे उत्तर नकारार्थक असे येते. विश्व कवी टागोरांच्या साहित्याला नोबेल मिळाले या घटनेला अनेक वर्षे लोटली, माय मराठीतील एका सिद्धहस्त लेखकाच्या कलाकृतीला देशाचे मानाचे ज्ञानपीठ मिळाले तोही काळ आता मागे पडला. प्रश्न हा उरतो की, त्यानंतर भाषेच्या प्रांतात असे काही आगळे वेगळे नाविन्यपूर्ण का घडले नाही? ते सोडा मराठी भाषिक जणांमध्ये किती लोकांनी असे नाविन्यपूर्ण शोध लावून त्याचे घेतलेले जे पेटंट्स आहेत त्याला नावे देताना ती मराठीतून दिली आणि जगाला तशीच्या तशी ती स्वीकारावी लागली ? तर याचेही उत्तर नकारात्मक आहे. आपल्या मराठी जणांनी अनेक क्षेत्रांमध्ये पेटंट घेतली मात्र त्याला दिलेली नावे ही इंग्रजी भाषेतीलच आहेत. एकट्या रामदेव बाबा नावाच्या व्यक्तीने योग, आयुर्वेद या नावाचे कमालीचे ब्रँडिंग करून ते जगभरातील ग्राहकांना जशाच्या तशा नावाने स्वीकारावयास भाग पडले. परिणामी आज जगाच्या कुठल्याही भूभागातील व्यक्ती योगा, प्राणायाम ही आपण दिलेलीच नावे जगाला स्वीकारावी लागली आहेत. एवढेच काय पतंजली या त्यांच्या उद्योग समूहाची सर्व उपकरणे दिलेल्या नावानेच जगभर वितरित होतात. उदाहरणार्थ त्यांची दंतकांती नावाची टूथपेस्ट इतर कोणत्याही भाषेतील ट्रान्सलेट केलेल्या नावाने विकली जात नाही तर दंतकांती याच नावाने फक्त त्या भाषेच्या लिपित लिहून वितरित केली जाते. म्हणूनच भाषेच्या विकसनामध्ये फक्त "साहित्य निर्मिती" हा एकमेव निकष असू शकत नाही. त्याकरता त्या भाषकांनी विविध क्षेत्रांमध्ये किती प्रमाणात कार्यकर्तृत्व दाखविले ही बाब खूप महत्त्वाची असते.
यानंतर जो मुद्दा येतो तो म्हणजे त्या भाषेत जे साहित्य, ज्या कलाकृती निर्माण होतात, सादर होतात त्यांचा सकसपणा, गुणवत्ता.... आज ती जोखण्याचे कोणतेही मापदंड आपण ठेवलेलेच नाहीत. आज जर आपल्या न्यायपालिकेने असा नियम आणला की, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय अशा कोणत्याही व्यासपीठावरून एखाद्या व्यक्तीला किंवा त्या समारंभाच्या अध्यक्षाला जर समोर बसलेल्या समूहाला संबोधित करावयाचे असेल तर हे सगळे वक्त्याचे किंवा अध्यक्षांचे सादरीकरण झाल्यानंतर कायद्यानुसार उपस्थित समूहाला त्यासंदर्भातील प्रश्न विचारण्याकरता दहा मिनिटांचा वेळ ठेवावाच लागेल. तसा वेळ जर ठेवला नाही तर आयोजकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. कल्पना करा असा जर कायदा आला तर आज जेवढे वक्ते मोठ मोठ्याने भाषणे ठोकतात त्यातील अगणित वक्ते घरातूनही बाहेर पडणार नाहीत. अनेक कार्यक्रमांना अध्यक्ष शोधूनही मिळणार नाहीत. त्याच्याही पुढे जाऊन जर लेखकांकडून प्रकाशित होणाऱ्या साहित्याला जर न्यायपालिकेने असा नियम लावला की, आपण प्रकाशित केलेले साहित्य प्रकाशित झाल्यानंतर कोणत्याही एका दैनिकांमध्ये त्याची प्रस्तावना प्रथम प्रकाशित करावी व समाजाला त्या साहित्याच्या संदर्भातील आपली मते मुक्तपणे मांडण्याची मुभा द्यावी तर अनेकांच्या लेखण्या कुपीत बंद होण्यास वेळ लागणार नाही आणि लिहिल्या गेलेल्या पुस्तकांना प्रस्तावना देणारे भेटतील का नाही हा मोठा प्रश्न असेल. आज प्र. के. अत्रे, दुर्गाबाई भागवत, प्रबोधनकार ठाकरे, पु ल देशपांडे, डॉ. एन. डी. पाटील यांच्यासारखे शेतकरी प्रश्नांवरती लिहिणारे नेते अशा एके काळच्या साहित्यिकांची फक्त नावेच घ्यावीत असा काळ आपण अनुभवतोय. कारण वर्तमानात त्यांचा वारसा चालवणारी नावे शोधून सापडतील की नाही याची घोर चिंता आहे.
आपली भाषिक शोष्ठवता मर्यादित करणारा आणखी एक भाग म्हणजे साहित्य नेमकं कशाला म्हणायचं ? याची एक चाकोरी आपण आखून ठेवलेली आहे. म्हणजे गद्य, पद्य, ललित वगैरे लिखाण केलं म्हणजेच ते साहित्य. असा एक सरळ धोट असा शिरस्ता आपल्या साहित्य विश्वात रूढ झाला आहे. याउलट पाश्चात्य जगात विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, क्षेत्रांमध्ये जे जे लिहिलं जातं, अभिव्यक्त होतं त्या सगळ्याला साहित्यविश्व आपलं मानत. त्याचा तेवढ्याच ममत्व भावनेने स्वीकार केला जातो. आपल्या इथं खगोलशास्त्र, पर्यावरण, विज्ञान, राजकारण, अर्थकारण, तंत्रज्ञान, इतिहास या क्षेत्रात गेले अनेक वर्षे जी काही साहित्य निर्मिती होत आहे त्याकडे चाकोरीतल्या पठडीत स्वतःला साहित्यिक म्हणविणाऱ्या क्षेत्रांनी अक्षरशः पाठ फिरवलेली दिसते. आपल्या इथे पार पडणाऱ्या अनेकविध साहित्य संमेलनानी आणि साहित्याच्या प्रांतातील कार्यक्रमांमध्ये त्यांची म्हणावी अशी दखल किंवा त्यांचा स्वीकार केलेला दिसत नाही. साहित्य विश्व एवढं संकुचित आहे की, एखाद्या नवोदीताला जर काही मांडायचे असेल, व्यक्त करायचे असेल तर त्याला अक्षरशः प्रकाशक, संपादक यांच्याकडे खेटे घालावे लागतात आणि ते घातल्यानंतरसुद्धा एखाद्या धर्मातून दुसऱ्या धर्मात प्रवेश करताना जसे अगोदर काही संस्कार करून घ्यावे लागतात तसे त्याने संस्कार करून घ्यावेत, स्वतःचे शुद्धीकरण करून घ्यावे आणि मगच त्याला प्रवेश दिला जाईल अशा थाटात त्याला भाषिक संस्कार, वांग्मयीन संस्कार, प्रमाण भाषेचे नियम आदींची सक्ती केली जाते. असे एकूण वातावरण असते.... पाश्चात्यांच्या जगात या उलट विविध क्षेत्रांमध्ये नव्याने काही आलेले दिसले की, साहित्य विश्व त्याची लगेच दखल घेऊन त्याला स्वतःमध्ये सामावून घेते. उदाहरणार्थ युरोपात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक लिखाण हे यंत्रमानव, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंडस्ट्री 4.0, क्रिप्टो करेंसी आदी विषयांवर झालेले आहे. हे सर्व लिखाण हे माहिती तंत्रज्ञान व अर्थशास्त्र यांच्याशी संबंधित आहे. त्या जगात हे शक्य आहे कारण आपल्यासारखी साहित्याची एक पोलादी चौकट तिथे दिसत नाही. परिणामी त्यांची साहित्यसृष्टी ही अधिकाधिक व्यापक, सर्वसमावेशी आणि उन्नत होत गेलेली दिसून येते. काही वर्षांपूर्वी मी व माझे गुरुवर्य डॉ. अनिलकुमार वावरे आम्ही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर "कोरोनायन" नावाचा ग्रंथ टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात प्रकाशित केला. मात्र तो सामाजिक शास्त्राशी व बहुतांशी विज्ञानाशी संबंधित असल्याने साहित्य विश्वाने त्याची कोणतीच दखल घेतली नाही. ही बाब जर शिक्षण क्षेत्रातील आमच्यासारख्या लेखकांच्या वाट्याला येत असेल तर डॉक्टर, वकील, वनस्पती शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, पर्यावरणतज्ञ यांच्यासारखी मंडळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जे काही लिखाण करत असतील त्याच्या बाबतीत काय होत असेल ? याचा विचारच न केलेला बरा. याचे एक अस्सल उदाहरण मला सापडले ते म्हणजे पर्यावरण नावाच्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर अतुल देऊळगावकर नावाची एक व्यक्ती फार मोठं काम करत आहे, लिहिते आहे, मांडते आहे मात्र या मनस्वी संशोधक, लेखक व हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्याच्या या कामाची योग्य ती दखल साहित्यविश्वातून घेतलेली मला तरी आठवत नाही.
साहित्य हे जीवनदायींनी सरितेसारखे समाजभर मुक्त आणि नैसर्गिकपणे प्रवाही असले पाहिजे आणि हे प्रवाहीपण हे अंगचे असले पाहिजे जसे की आपण सायपण पद्धतीने शेताला पाणी देतो. मात्र आज आमच्या मराठी जणांमध्ये वाहणारी साहित्य सरिता आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा ती गव्हर्नमेंट म्हणजे शासन नावाच्या यंत्रणेकडून अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने संचलित, नियमित व नियंत्रित करून वाहती केलेली दिसून येते. साहित्यिक स्वतःच्या उन्मेशातून किती उपक्रम राबवतात आणि शासकीय अध्यादेश व परिपत्रकांची अंमलबजावणी करणे या हेतूने किती कार्यरत असतात याची जर तुलना केली तर आपल्या हे लक्षात येईल. दुर्दैवाने महाविद्यालय, विद्यापीठे यामध्ये अग्रभागी असल्याचे चित्र दिसते. खरंतर याबाबतीत स्वतः समाज, समाजातील साहित्यिक, साहित्यिकांच्या संस्था, महाविद्यालय आणि विद्यापीठे यांनी स्वयंप्रेरणेने, भाषेच्या प्रेमातून आणि साहित्याच्या गरजेतून खूप नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवायला हवेत आणि ते तसेच राबवले गेले तर शासनाला अध्यादेश, परिपत्रके काढून विविध कार्यक्रम राबविण्यासाठी काम करायची गरजच उरणार नाही. ज्याअर्थी या प्रांतात शासन नको तेवढे ऍक्टिव्ह दिसते त्याचाच अर्थ समाजामध्ये या संदर्भात एक पोकळी आहे आणि शासन ती भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्याच्या काळात युरोपामध्ये आणि भारतात देखील समाज माध्यमांचा खूप प्रचार आणि प्रसार झालेला आहे. परिणामी पूर्वीप्रमाणे दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके यांमध्ये प्रसारित व प्रकाशित होणाऱ्या साहित्यापेक्षा जनमानसांचा ओढा हा या समाज माध्यमांकडे खूप आहे परिणामी नव्याने काहीतरी लिहू पाहणारे अनेक जण व्हाट्सअप, फेसबुक, ब्लॉग्स आदींच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत. युरोपातील साहित्यसृष्टीने याकडे सकारात्मक बघत या समाज माध्यमांवर जे नव्याने चांगले साहित्य येत आहे त्याचे स्वागत करत स्वतः त्याच्याशी संपर्क साधून त्या लेखकांचे साहित्य हे आपल्या पारंपारिक वृत्तपत्रे, मासिके, दैनिके यामध्ये त्यांना आमंत्रित करून प्रकाशित करावयास सुरुवात देखील केली आहे. आपले साहित्यविश्व अशा बदलांचा स्वीकार कधी करणार आहे? कल्पना करा एखादा नवोदित लेखक खूप चांगले ब्लॉग लिहितोय म्हणून एखाद्या वृत्तपत्राच्या संपादकाने त्याच्याशी संपर्क साधून त्याची संमती घेऊन त्याचे लिखाण आपल्या प्रतीथयश वगैरे म्हणविणाऱ्या दैनिकांमध्ये प्रकाशित केले असं काही आपल्याकडे घडलं तर त्याचे सर्वांनाच किती नवल वाटेल.
म्हणूनच मनोमन असे वाटते की, अभिजातता प्राप्त झालेल्या आपल्या माय मराठीला तितकेच साजेशी असे सौष्ठव प्राप्त व्हावे याकरिता साहित्यसृष्टीनेही थोडा "वसुधैव कुटुंबकम" या उक्तीप्रमाणे आपला पैसा आता उदार म्हणजे लिबरल करावा. समाजातील लोकांनी आता "जाहलो खरेच धन्य बोलतो मराठी" एवढ्यापुरती मराठी विषयाची आपुलकी, प्रेम आणि श्रद्धा न ठेवता आपापल्या क्षेत्रात असे काही नेत्रदीपक करायला हवे, किमानपक्षी तसा प्रयत्न तरी करायला हवा की, ज्याने माय मराठी भाषेतील शब्दसंपत्तीत मोलाची भर पडत राहील. तसेही आपण किती दिवस भाषेतल्या जुन्या शब्दांना उकरून काढत "शब्दसागरातील मोती.... शब्द सागरातील मोती" म्हणत बसणार आहोत. याचाही विचार व्हायला हवा. अभिव्यक्ती ही प्रत्येकाची स्वतंत्र आणि स्वयंप्रज्ञ असते ती जशीच्या तशी स्वीकारून त्याला आपलेसे करण्याचे औदार्य देखील साहित्यसृष्टीने दाखवायला हवे. त्याचबरोबर समाज माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या नवसाहित्याला आपल्या प्रांतामध्ये स्नेहपूर्वक आमंत्रित करण्याची एक नवी पेहेल साहित्य विश्वाने करायला हवी. विविध व्यासपीठांवरून होणारी व्याख्याने आणि कार्यक्रम यांत सहभागी होणाऱ्या श्रोतृवृंदांनी प्रश्न विचारायला सुरुवात करावी. त्यामुळे बोलणारे विचारपूर्वक आणि अभ्यास करून बोलतील त्यातून भाषेचे वाढलेले स्खलन रोखता येईल. नाहीतर आजकाल घडतय असं बोलणारा, आयोजन करणारे आणि ऐकणारे हे एकाच गटातले असतात जसे काही लोक मिळून चिटफंड किंवा भिशी चालवतात. प्रत्येकाचा नंबर आला की सर्वजण टाळ्या वाजवतात कारण प्रत्येकाला माहिती असते की आज जसा यांचा नंबर आला आहे तसा आपलाही येणार आहे. म्हणजे आज आपण टाळ्या वाजवल्या तर इतर जण आपला नंबर आल्यानंतर टाळ्या वाजवतील. आपल्या विविध प्रांतातील साहित्य विश्वात हेच चालल आहे. बोलणारा, आयोजन करणारे आणि ऐकणारे हे एकाच एकजिंनशी गटाचे असतात तेव्हा प्रत्येकाला माहिती असते की, आपलाही नंबर कधी ना कधी येणारच आहे. त्यामुळे एकूणच चाललेला हा सागरसंगीत कार्यक्रम आपणाला कुठे घेऊन जाणार आहे ? याचेही चिंतन आपल्याला लाभलेल्या अभिजात दर्जाच्या निमित्ताने व्हायला हवे!
- किशोर जी. सुतार, मो. ८३२९३ ८९९७९
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!