डॉक्टरला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून १ कोटी खंडणीची मागणी

 


डॉक्टरला हनीट्रॅपच्या जाळ्यात

ओढून १ कोटी खंडणीची मागणी 

शिरवळ परिसरात सापळा रचून दोन युवकांना पोलिसांनी केले जेरबंद 

सातारा : खंडाळा तालुक्यातील विंग येथील क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टरशी एका महिलेने सलगी वाढवून त्यांच्या क्लिनिकमधील महिला कामगाराशी केलेल्या वर्तनाचे खंडणीखोर महिलेने व्हिडीओ चित्रण केले होते. त्या चित्रिकरणाचा वापर करून तुमचे वैद्यकिय लायन्सस रद्द करून तुमची बदनामी करू, अशी धमकी फोनवरून अज्ञात व्यक्तीने करत डॉक्टरांकडे १ कोटींची खंडणी मागितली होती. याबाबत अज्ञात खंडणीखोर दि. ६ मार्च २०२५ पासून डॉक्टरांना व त्यानंतर त्यांच्या पत्नीला मोबाईल संदेश व फोन करून धमकावून खंडणीची मागणी करीत होते. त्याबाबत डॉक्टर पती-पत्नीला पोलिसांनी "खंडणीखोरांबाबत तक्रार द्या," असे आवाहन केल्याने डॉक्टर पती-पत्नीने अज्ञात खंडणीखोरांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

याप्रकरणी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनेचा सखोल अभ्यास करून खंडणीखोरास जेरबंद करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन केले. त्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कीर्ती म्हस्के, महादेव शिद, पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट व पोलीस अंमलदार पोलीस हवालदार प्रशांत धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल सुरज चव्हाण, अजित बोराटे, भाऊसाहेब दिघे, अरविंद बा-हाळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्नेहल शिंगटे, नीलिमा भिलारे, संतोष इंगवले यांना एकत्र करून कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.

दरम्यान, डॉक्टरांच्या पत्नीकडील मोबाईलवर खंडणीखोराकडून १ कोटीची खंडणी घेऊन शिरवळ येथील रामेश्वर मंदिर परिसरात येण्यासाठी सांगितले. यावेळी कारवाईसाठी मंदिर परिसरात पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता. यावेळी नियोजनानुसार ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी डॉक्टरची पत्नी खंडणीखोरास एक कोटीची रक्कम घेऊन रामेश्वर मंदिर परिसरात आली असताना एका मोटारसायकलवर डबलशीट बसून दोन व्यक्ती खंडणीची रक्कम घेण्यासाठी आले. त्यांनी डॉक्टरच्या पत्नीशी चर्चा करून खंडणीची रोख रक्कम ठेवलेली पर्स खंडणीखोरांच्या ताब्यात दिली. त्यांनी पर्समधील रकमेची पाहणी केली. त्यांनी खंडणीची रक्कम पाहून खंडणी मिळाल्याची खात्री झाल्याने खंडणीखोर पर्स घेऊन निघून जात असतानाच जवळच लपलेल्या पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील खंडणीची रोख रक्कम असलेली पर्स ताब्यात घेतली.

खंडणीखोरांकडे त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे नितीन नवनाथ प्रधान (वय २०, मूळ रा. कारी, ता. माजलगाव, जि. बीड हल्ली रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा व दत्ता आप्पाराव घुगे (वय २४, मूळ रा. कासारगाव ता. जि. लातूर, हल्ली रा. शिंदेवाडी, ता. खंडाळा जि.सातारा) अशी सांगितली. खंडणीखोरांकडून खंडणीची रक्कम ठेवलेली पर्स, मोटारसायकल, मोबाईल, सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त केला. या खंडणीचा तपास शिरवळ पोलीस करीत आहेत. या कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदारांचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर श्री राहूल धस फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांनी अभिनंदन केले.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

खंडणीची मागणी करणाऱ्यांविरुद्ध नागरिकांनी निर्भयपणे पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवावी. आपले नाव गुपित ठेवून खंडणीखोरांवर कठोर कारवाई होईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments