अजित ननावरे यांना मिळाला बावधनच्या बगाड्याचा मान

 


अजित ननावरे यांना मिळाला

बावधनच्या बगाड्याचा मान

भावाच्या नवसपूर्तीनंतर यावर्षी पहिल्यांदा कौल

सातारा : बावधन (ता. वाई) येथील प्रसिद्ध बगाड यात्रा बुधवार, दि. १९ मार्च रोजी होत असून, यावर्षीचा बगाड्या होण्याचा मान अजित बळवंत ननावरे (वय ३५) यांना मिळाला आहे.

बगाड्या अजित ननावरे यांनी २०१४ला आपला २ नंबरचा भाऊ सुनील याचे लग्न होऊ दे आणि घरात सुख शांती लाभू दे म्हणून भैरवनाथास नवस केला होता. सुनील यांच्या लग्नात खूप अडथळे येत होते. ठरलेलं लग्न मोडत होत. नवस बोलल्यानंतर २ वर्षातच २०१६ मध्ये सुनील याचे लग्न झाले.

नवसपूर्तीनंतर ननावरे यांनी एकदाही कौल घेतला नव्हता. यावर्षी ते पहिल्यांदा कौलास बसले. होळी पौर्णिमेच्या रात्री १२ वाजता देवाचा कौल घेण्यासाठी ४४ नवशे भैरवनाथ मंदिरात जमले होते. यातील १० व्या क्रमांकाच्या ननावरे यांच्या बाजूने कौल आल्याने ननावरे यांना बगाड्या होण्याचा मान मिळाल्यानेे ननावरे भावकीत आनंदाचे वातावरण आहे. बगाड्या ननावरे हे 'होमगार्ड' म्हणून कार्यरत असून त्यांना २ बंधू आहेत.

बगाड्या निश्चित झाल्यानंतर त्याला ५ दिवस मंदिरातच वास्तव्य करावे लागते. मंगळवार, दि. १८ रोजी भैरवनाथांचा छबिना निघणार असून, १९ तारखेला यात्रेचा मुख्य दिवस असून बगाड यात्रा होणार आहे. तिसऱ्या दिवशी लोकनाट्य तमाशा व संध्याकाळी नामवंत मल्लाच्या कुस्त्या होणार आहेत.

दरम्यान, काल बगाड्याची निवड करण्यात आल्यानंतर बावधन तसेच पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी हलगी तसेच तुतारीच्या निनादात सातारा येथील खा. उदयनराजेंचे निवासस्थान असलेल्या जलमंदिर पॅलेसवर जात त्यांना काशिनाथाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करीत त्यांचा सत्कार केला. यावेळी खा. उदयनराजेंनी ग्रामस्थांचे स्वागत केले. तसेच यात्रेला उपस्थित राहणार असल्याबाबतची ग्वाही दिली.



Post a Comment

0 Comments