फुले दाम्पत्यांचे कार्य देशाला प्रेरणा देणारे : प्रा. डॉ. राजेंद्र मोरे
छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले स्मृतीदिनी कार्य विचार चिंतन
सातारा : स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी आजसुद्धा आपण सजग नसतो, पण जेव्हा शिक्षणच मिळत नव्हते, जातीभेद होता, प्रतिकूल परिस्थिती होती अशा काळात स्वतःला मूल नसतानादेखील दुसऱ्यांच्या मुला-मुलींसाठी आस्था आणि तळमळीने जोतीराव व सावित्रीबाई यांनी शिक्षण दिले. सर्व प्रकारची गुलामगिरी दूर करण्यासाठी, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी, अखिल समाजात समता आणि बंधुत्व निर्माण करण्यासाठीचे फुले दाम्पत्यांचे कार्य देशाला प्रेरणा देणारे आहे, असे विचार रयत शिक्षण संस्थेच्या ऑडीट विभागाचे सहसचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या आंतर विद्याशाखा विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर. आर. साळुंखे, विद्यापीठ भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ. सुभाष वाघमारे, उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख, ज्युनियर विभाग उपप्राचार्य डॉ.गणेश पाटील, स्टाफ वेल्फेअर विभाग प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी पाटील, प्रा.संदीप भुजबळ, अधीक्षक तानाजी सपकाळ व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
सावित्रीबाई यांचे धैर्य, करुणा आणि नेतृत्व याबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, सर्व मुलांच्या शिक्षणासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी अतिशय तळमळीने जनजागृतीचे, न्यायाचे कार्य सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांनी केले. सत्याचा शोध घेऊन समाजमनाला डोळस केले. यशवंतसारख्या मुलाला दत्तक घेऊन त्याला देखील लोकहिताची दृष्टी दिली. जोतीराव मृत्यू पावल्यानंतर अंत्यविधी करत असताना दत्तकपुत्र यशवंत याला जेव्हा काहींनी विरोध केला तेव्हा सावित्रीबाई यांनी स्वतः यशवंतला सोबत घेऊन अंत्यविधी करवून घेतले. हे त्या काळातील खूप क्रांतिकारी कार्य होते. ज्योतीराव यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व त्यांनी केले. त्या विचाराशी ठाम होत्या. १८९७ ला पुण्यात प्लेगची साथ आली. या काळात यशवंत याने वैद्यकीय शिक्षण घेतले असल्याने प्लेग झालेल्या अनेकांना उपचारासाठी त्यांनी यशवंतकडे नेले. हे सेवा कार्य करत असताना या माऊलीला प्लेग झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. सारे आयुष्य त्यांनी गरिबांच्या न्यायासाठी, हक्कासाठी, समाजाला शिक्षण देण्यासाठी समर्पित केले. सावित्रीबाई यांच्या कार्याचा वारसा, आपण जपला पाहिजे असे ते म्हणाले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!