कलात्मक
सृजनशिलता, चिंतनशिलता
हा अनिल अवचटांच्या
लेखनाचा गाभा:डॉ. बाबा आढाव
ज्येष्ठ लेखक ‘उपरा’कार लक्ष्मण माने लिखित ‘अनिल’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : कोणताही समाज उन्नतीच्या वाटेवर आहे का, हे तपासण्याची फुटपट्टी म्हणजे त्या समाजातील कलात्मक सृजनशिलता आणि चिंतनशिलता याची बैठक होय. डॉ. अनिल अवचट यांनी सारस्वतांच्या साहित्यिक चौकटी मोडून शोषितांचे जगणे मांडले याअर्थी कलात्मक सृजनशिलता आणि चिंतनशिलता हा अवचट यांच्या लेखनाचा गाभाच होता, असे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ लेखक ‘उपरा’कार लक्ष्मण माने लिखित आणि मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित ‘अनिल’ या पुस्तकाचे प्रकाशन आरोग्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. बाबा आढाव बोलत होते.
एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या मोंडकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखक ‘उपरा’कार लक्ष्मण माने, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आणि मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणेचे अखिल मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबा आढाव म्हणाले, अनिल अवचट यांनी चळवळीत खूप काम केले आणि मोठे योगदान दिले. त्यांनी चळवळीतील आमच्यासह सगळ्यांनाच समस्यांकडे पाहण्याचा आणि त्या समस्या हाताळण्याचा एक निकोप दृष्टीकोन आणि एक नवीन आयाम दिला. अनिल म्हणजे माणुसकीचा ओतप्रत झरा होता. त्याने एकंदरीतच माणुसकीचा स्तर खूप उंचावला. प्रस्थापित साहित्यिकांच्या वाटेला न जाता मूलभूत मुल्यांच्या लढाईत तो सक्रिय राहिला.
डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, प्रस्थापित सारस्वतांच्या साहित्यिक परंपरेला छेद देत अनिल अवचट यांनी लेखन केले. अवचट यांच्या या लेखनशैलीमुळे तत्कालीन तथाकथित साहित्यिक अवचट यांना साहित्यिक मानायला तयार नव्हते. एवढेच नव्हे तर साने गुरुजींसारख्या चळवळीतील साहित्यिकासदेखील तत्कालीन निर्ढावलेले तथाकथित लोक साहित्यिक मानायला तयार नव्हते. त्यावेळी तुम्हा सारस्वतांचे सर्व साहित्य एका पारड्यात ठेवले आणि साने गुरुजी यांनी लिहिलेले 'श्यामची आई' एका पारड्यात ठेवले तरी साने गुरुजी यांच्या 'श्यामची आई' या साहित्य कृतीचेच पारडे जड होईल, अशी टिपण्णी प्रसिद्ध साहित्यिक पु. ल . देशपांडे यांनी केली होती. लक्ष्मण माने यांनी त्यांच्या लेखनातून वेदनेचे काव्य मांडले. त्यांचे आज प्रकाशित झालेले 'अनिल' हे पुस्तक म्हणजे माने यांनी केलेली समाजव्यवस्थेची समीक्षाच आहे. अनिल अवचट यांनी लक्ष्मण माने यांच्या हातात लेखणी देऊन त्यांना लिहिते केले. कालांतराने माने यांनी ‘उपरा’ लिहून इतिहास घडवला.
ज्येष्ठ लेखक ‘उपरा’कार लक्ष्मण माने म्हणाले, बाबा आढाव आणि अनिल अवचट यांच्यासारखी माणसे माझ्या आयुष्यात आली नसती तर माझे आयुष्य फार वेगळ्या वाटेवर गेले असते. मी ज्या समाजातील आहे, त्या समाजात मी वाचावे किंवा लिहावे असा आग्रह धरणारे कोणीही नव्हते. ज्ञानपरंपरा आमच्या समाजात नव्हती. बाबा आढाव आणि अनिल अवचट माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगी माझ्या आयुष्यात माझ्या बरोबर उभे राहिल्यामुळे मी सावरलो. अनिल शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होता आणि बाबा आढाव वयाच्या नव्वदीतही धावपळ करतात आणि ते आजही कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पाहून आम्हाला लढण्याची आणि कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी पुस्तक परिचय करून दिला. मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणेचे अखिल मेहता यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!