सदस्य अभियानात राज्यात सातारा जिल्हा पहिला नंबरवर राहणार : जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम


राज्यात सदस्य अभियानात

सातारा जिल्हा पहिला नंबरवर

राहणार : धैर्यशील कदम 

सातारा जिल्हा भाजपा सदस्य अभियान बैठक; 

मिस्ड कॉलद्वारे व्हा भाजपाचे सदस्य

सातारा : भाजपा सदस्य नोंदणी अभियानात सातारा जिल्हा महाराष्ट्रमध्ये पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वास सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला.

साताऱ्यात आज भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा सदस्य अभियानाची बैठक संपन्न झाली. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली झाली.

विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात पक्ष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात महाराष्ट्रात एक कोटी एकावन्न लाख एवढी विक्रमी प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कमीत कमी दहा लाख प्राथमिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी पदाधिकाऱ्याना केले.

साताऱ्यात झालेल्या मंडल अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आणि मोर्चा अध्यक्ष यांच्या बैठकीत श्री धैर्यशील कदम यांनी ही माहिती दिली. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले.

रविवारपासून या अभियानाला प्रारंभ झाला असून राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे या अभियानाचे राष्ट्रीय संयोजक आहेत. प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील हे या अभियानाचे प्रदेश संयोजक आहेत. विक्रम पावसकर यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी असून, या अभियानाच्या सातारा जिल्हा संयोजक पदाची जबाबदारी, सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी यावेळी दिली. हे अभियान चांगले राबवले जावे यासाठी सातारा जिल्हास्तरावर सात जणांची एक समिती तयार केली असून, प्रत्येक मंडल स्तरावर सुद्धा सात जणांची एक समिती करून त्यानी समन्वयाने काम करून आपले उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय अध्यक्ष जगदप्रसाद नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत देशभरात सदस्यता मोहीमेला सुरुवात झाली आहे. ज्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होत्या, त्या राज्यात सदस्य नोंदणीचा कार्यक्रम निवडणुकीनंतर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे, असेही कदम यांनी सांगितले.

मिस्ड कॉलद्वारे व्हा भाजपाचे सदस्य

भाजपाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी 8800002024 या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर एक मेसेज प्राप्त होईल, ज्यामध्ये प्राथमिक सदस्यत्व नोंदणी क्रमांक दिला जाईल. त्याचबरोबर ज्यांना संघटनात्मक जबाबदारी घेण्याची इच्छा आहे. संघटनेत पदाधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी वैयक्तिकरित्या कमीत कमी दोनशे प्राथमिक सदस्य करणे आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरच होतील, अशी माहिती कदम यांनी दिली.

भाजपा सदस्य अभियानासाठी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी मिळाल्याबद्दल प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील आठही आमदार निवडून आणण्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी घेतलेल्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि महायुती जिल्हा समन्वयक सुनील तात्या काटकर यांच्या अभिनंदनचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आलेले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, आमदार अतुलबाबा भोसले, आमदार सचिन कांबळे पाटील यांच्याही अभिनंदनचा आणि सातारा जिल्ह्यातील सर्व आमदारांचा मंत्रिमंडळात योग्य सन्मान व्हावा यासाठीचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे महायुतीच्या विजयामध्ये हातभार लावणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष, प्रदेश, जिल्हा, मंडल पदाधिकारी, आघाड्या मोर्चे यांचे प्रदेश, जिल्हा, मंडल पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि अहो रात्र झटणारे कार्यकर्ते यांच्याही अभिनंदनचा ठराव मंजूर करण्यात आला.

यावेळी भीमराव पाटील, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी, संतोष कणसे, विकल्प शहा, मनीषा पांडे, सागर शिवदास, सुनील शिंदे, श्रीहरी गोळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments