जनता आपल्याला पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही : पुरुषोत्तम जाधव
शिरवळ येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून मानकुमरेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध
सातारा : ज्या खंडाळा तालुक्याच्या जीवावर आपल्या तीन पिढ्या राजकारण व समाजकारणात टीमक्या वाजवत आहेत, अशाच खंडाळा तालुक्यातील नेतृत्व करत असलेल्या व आपल्याच ज्येष्ठ सच्चा कार्यकर्त्याला मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले होते. हे खंडाळा तालुक्यातील तमाम जनतेसाठी घृणास्पद आहे. ज्या खंडाळा तालुक्यातील जनतेने आपणास आतापर्यंत डोक्यावर घेऊन नाचवले, आता हीच जनता आपल्याला पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी मकरंद पाटील यांना दिला आहे.
वाई -खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. मकरंद पाटील यांनी घेतलेल्या मेळाव्यात खंडाळा तालुक्यातील ज्येष्ठ नेते नितीन भरगुडे पाटील यांच्यावर वाई येथे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आज शिरवळ येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीचे उमेदवार आ. मकरंद पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. आता खंडाळा तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यावर तोंडसुख घेण्याचे उद्योग सुरू केले आहेत. ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आयुष्यभर पाटील घराण्यासाठी निष्ठा वाहिली अशा एकनिष्ठ नेत्यांनाच त्यांची लायकी काढण्याचे उपरती यांना झाली आहे. एवढेच काय तर त्यांच्या आजारपणावर देखील तोंडसुख घेण्याचं काम या सभेमध्ये आमदारांच्या बगलबच्चांनी केला आहे. यावेळी स्टेजवरील सर्व मान्यवर हजारो लोकांच्या समुदायासमोर दात काढून हसण्याचं काम सर्वांनीच केले आहे. संविधान आणि लोकशाहीमध्ये सर्वांनाच लढण्याचा अधिकार आहे. परंतु या सभेमध्ये मकरंद पाटलांच्या विरुद्ध लढल्यास लोक वेडी होतात, असे वक्तव्य करून जे कोणी लढणाऱ्या उमेदवाराच्या विरुद्ध टीका करण्यात आलेली आहे. स्वाभिमानी वाई,महाबळेश्वर व खंडाळा तालुक्यातील मतदार आता आपल्या गुंडशाहीला झुकणार नाही. जनतेने आता तरी या घराणेशाहीला कायमचे घरी बसवण्यासाठी एक व्हावे. मी नेतृत्व करण्यास तयार आहे. आपण फक्त पाठीशी राहा. एका एकाची पळताभुई केल्याशिवाय हा पुरुषोत्तम जाधव स्वस्थ बसणार नाही. घराणेशाहीच्या माध्यमातून सत्तेची व पैशाची मस्ती जिरवण्यासाठी खंडाळा तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील एकेक मतदार आता पेटून उठला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, सातारा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी सातारा जिल्हा माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील यांच्यावर तसेच शिवसेना (शिंदे गट) चे माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्यावर नाव न घेता केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावर राजकीय वातावरण तापले आहे. खंडाळा तालुक्यातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा घडू लागली आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या जिल्हाप्रमुख पदासाठी यादीमध्ये नाव असलेले नितीन भरगुडे-पाटील व अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले पुरुषोत्तम जाधव नेमकी काय भूमिका घेतात याकडे खंडाळा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे औद्योगिक जिल्हाध्यक्ष दत्तात्रय उर्फ बंडू ढमाळ यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार टिकास्त्र सोडले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!