हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत प्रतापगडावर मशाल महोत्सव


हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत

प्रतापगडावर मशाल महोत्सव


सातारा : शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेला प्रतापगड मशालीनी उजळून निघाला. गडावर 365 मशाली पेटवून हा महोत्सव पार पडला. नवरात्रीच्या पाचव्या माळेला प्रतापगडावर मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते. यंदा मशाल महोत्सवाचे पंधरावे वर्ष असून २०१० या वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. मशाल महोत्सव नवरात्रौत्सवातील षष्ठीच्या दिवशी करण्यात येते.

हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून मशाल महोत्सवाचा आनंद लुटला. ढोल- ताशांचा गजर व फटाक्यांच्या आतषबाजीने अवघा गड व परिसरात उजळून निघाला. चंद्रकांत आप्पा उतेकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या हस्ते आई भवानीच्या साक्षीने मशाल प्रज्वलीत करुन मशाल महोत्सवाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

सकाळी भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री नऊच्यादरम्यान ढोल, ताशांच्या गजरात ‘जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या.

या वेळी नगारे, तुतारी, सनई, तसेच प्रतापगडावरील स्वराज्य ढोल, ताशा, पथक व लेझीमच्या गजरात, तसेच भगवे झेंडे फडकावत मशाली पेटून दीपोत्सव साजरा झाला. या वेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.

गडावर सर्वत्र लावलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांनी डोळ्यात साठवून ठेवला. किल्ल्याच्या चहूबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भवानी माता मंदिर ते बुरुजापर्यंत लावलेल्या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला होता.

मशाल महोत्सवास अर्चना वाघमाळे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सातारा), तेजस्विनी पाटील (तहसिलदार महाबळेश्वर), रेड्डी (महाबळेश्वर विद्युत मंडळ शाखा), आशिष मारगुडे (दिवाणी न्यायाधिश वाई), शशिकांत निचळ (दिवाणी न्यायालय वाई ), सांडभोर (पोलीस निरिक्षक

महाबळेश्वर), रौफ इनामदार (पोलीस उपनिरिक्षक महाबळेश्वर), चंद्रकांत कळंबे (माजी उपाध्यक्ष जि.प. रायगड), यशवंत भांड ( गटविकास अधिकारी पं. स. महाबळेश्वर), महादेव कांबळे (सहाय्यक गटविकास अधिकारी महाबळेश्वर), सुनील पार्टे (विस्तार अधिकारी पं.स. महाबळेश्वर), आनंद पळसे (गटशिक्षण अधिकारी पं. स. महाबळेश्वर) यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments