विराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून परिवर्तन अटळ, परिवर्तन निर्धार यात्रा

 


विराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली

उद्यापासून परिवर्तन अटळ,

परिवर्तन निर्धार यात्रा 

प्रतापगडावर शिवाजी महाराज व आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन प्रारंभ होणार

वाई : वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन करण्याचा निर्धार करीत काँग्रेसचे नेते विराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रतापगड ते शिरवळपर्यंत 'परिवर्तन निर्धार यात्रा' काढण्यात येत आहे. यात्रेची सुरुवात दि. 3 ऑक्टोबरपासून होत असून, शेवट 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही यात्रा खंडाळा-वाई-महाबळेश्वर या तिन्ही तालुक्यातील २०१ गावातून जाणार आहे. सुमारे ३ लाख मतदारापर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही यात्रा म्हणजे जनतेचा आवाज असून सर्वसामान्य नागरीकांनी उत्स्फूर्तपणे परिवर्तन निर्धार यात्रेत सामील व्हावे, असेही विराज शिंदे यांनी सांगितले. 

विराज शिंदे म्हणाले, "विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरकारभाराचा भांडाफोड या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याशिवाय वाई-महाबळेश्वर-खंडाळा या मतदारसंघाच्या विकासाचा नवा रोड मॅप जनतेसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे.

शिंदे पुढे म्हणाले की "मकरंद पाटील यांनी आपल्या कार्यकाळात महाबळेश्वर तालुक्याला क्वचितच भेट दिली आहे. हा भाग दुर्गम असल्यामुळे तेथे जाण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. गेल्या १५ वर्षात आपल्या आमदाराचा चेहरादेखील लोकांना माहीत असू नये हे निश्चितच खेदाची बाब आहे. तसेच हे आमदार म्हणून मकरंद पाटील यांचे घोर अपयशदेखील आहे", अशी टीका शिंदे यांनी केली. 

माझा माझ्या मतदारसंघातील मतदारांवर ठाम विश्वास असून यावेळेला जनतेने परिवर्तनेचा निर्धार केला आहे, असे स्पष्ट करून विराज शिंदे म्हणाले, "जनतेला वारंवार गूहीत धरून आपला स्वार्थ साधणारे लोकप्रतिनिधी आता आम्हाला नको आहेत. रोजगार, विकास,‌ वीज, पाणी, पायाभूत सुविधा शिक्षण, आरोग्य याला आमचे प्राधान्य आहे. म्हणून आता परिवर्तन आवश्यक आहे. यासाठीच परिवर्तन निर्धार यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा भव्य होणार असून परिवर्तनाची इच्छा असणाऱ्या प्रत्येक स्वाभिमानी व्यक्तींनी या यात्रेत सहभागी व्हावे," असे आवाहनही शिंदे यांनी केले आहेत. दरम्यान, या यात्रेमध्ये वाई-खंडाळा-महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी होत आहेत. प्रतापगडच्या पायथ्याशी श्री छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन परिवर्तन निर्धार यात्रेस प्रारंभ होणार आहे.

Post a Comment

0 Comments