राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
यांच्याशी भाजपा पदाधिकाऱ्यांची
समस्या व विकासात्मक चर्चा
सातारा : महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सातारा जिल्ह्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा विधानसभा संयोजक अविनाश कदम, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे यांनी सातारा सर्किट हाऊस येथे त्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सातारा जिल्ह्याच्या समस्या व इतर विकासात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. भाजपा पदाधिकाऱ्यांनी चर्चा करताना विकासात्मक मुद्द्यांची मांडणी केली.
धैर्यशील कदम म्हणाले, सर्व मोठी धरणे सातारा जिल्ह्यात असूनही सातारा जिल्ह्यातील पाणी सातारा जिल्ह्यात न मिळता इतर जिल्ह्याला पाठवले जाते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडील भाग हा कायम दुष्काळी राहतो. यासाठी धरणातील पाण्याचे वाटप करताना पहिल्यांदा सातारा जिल्ह्यातील सर्व गावांना पाणी पुरवावे आणि नंतरच इतर जिल्ह्यामध्ये पाणी सोडावे. त्याचप्रमाणे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा जो प्रश्न शिल्लक आहे तो तातडीने सोडवावा.
स्वातंत्र्यपूर्व काळात जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे सातारा जिल्ह्यातील वडूज या ठिकाणी सुद्धा क्रांतीकारकांची हत्या करण्यात आली. या ठिकाणी नऊ क्रांतीकारकांची स्मारके आहेत, त्या स्मारकाकडे जागा सुद्धा आहेत; परंतु स्मारकांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या स्मारकांची पुनर्बांधणी करून स्मारकांच्या मोकळ्या जागेत बगीचा आणि इतर गोष्टी केल्या तर त्यापासून नवीन पिढीला बोध घेता येईल आणि इतिहासाची माहिती घेता येईल.
अविनाश कदम म्हणाले, सातारा शहरातील पार्किंगसाठी खूप अडचणी येत आहेत. यासाठी राजवाड्याजवळ जो जनावरांचा दवाखाना आहे तो दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करून त्या ठिकाणी सुसज्ज असे सात मजली पार्किंग तयार करावे आणि सातारा शहरातील पार्किंगचा प्रश्न मिटवावा. यासाठी जनावरांच्या दवाखान्याची जी जागा जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे ती सातारा नगरपालिकेकडे हस्तांतरित करावी.
विकास गोसावी म्हणाले, सातारा जिल्ह्याला पर्यटनाची खूप मोठी संधी असून, कास पठार हे खूप मोठे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी निसर्ग सौंदर्य भरपूर आहे. कास पठारपासून राजमार्गाने मिनी किंवा टॉय इलेक्ट्रिक ट्रेन, सातारा जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे पर्यटन स्थळ महाबळेश्वरपर्यंत न्यावी, तसेच या ट्रेनच्या ४२ किलोमीटरच्या मार्गामध्ये दहा ठिकाणी प्रेक्षा गॅलरी तयार कराव्यात. यामुळे पर्यटनाला खूप मोठी संधी निर्माण होणार आहे. रोजगारही उपलब्ध होणार आहेत आणि इलेक्ट्रिक ट्रेन असल्यामुळे निसर्ग सौंदर्यालाही कोणतीही बाधा येणार नाही. ट्रेनमधून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतल्यामुळे निसर्गाची हानी सुद्धा होणार नाही.
अजून एक विषय राज्यपालांच्या अखत्यारीतील असल्यामुळे त्यांच्यासमोर मांडण्यात आला. क्रीडा क्षेत्र हे खूप मोठे असून, महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये लहान मुलांपासून किंवा मोठ्या व्यक्तीपर्यंत एक जण तरी क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे पदवीधर आणि शिक्षक आमदार प्रत्येक विभागातून निवडला जातो. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातही प्रत्येक विभागातून एक आमदार निवडावा आणि क्रीडा क्षेत्राला समृद्ध होण्यासाठी मदत करावी.
विठ्ठल बलशेटवार म्हणाले, सातारा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही या ठिकाणी कोणतीही पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था नाही. पूर्वीची व्यवस्था होती ती बंद झालेली आहे. त्यामुळे सातारा शहरात आणि परिसरातील गावांमध्ये इलेक्ट्रिक मिनी सिटी बस सुरू करावी. सातारा शहरांमध्ये अनेक ठिकाणी आणि चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत; परंतु ते सध्या बंद आहेत. सध्याची परिस्थिती पाहता सीसीटीव्ही कॅमेरे चालू असणे आवश्यक असल्यामुळे प्रशासनाला आदेश देऊन सीसीटीव्ही कॅमेरे चालू करून घ्यावेत.
संतोष कणसे म्हणाले, सातारा जिल्हा ही सैनिकांची भूमी ओळखली जाते. सातारा जिल्ह्यातील अपशिंगे या गावाला मिलिटरी अपशिंगे या नावाने ओळखले जाते. या गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती तरी मिलिटरीमध्ये आहे, असे असूनही सातारा जिल्ह्यामध्ये भरती केंद्र नाही. सातारा जिल्ह्यामध्ये पूर्वीप्रमाणे मिलिटरी भरती केंद्र चालू करावे. त्याचप्रमाणे बेळगावप्रमाणे मिलिटरी ट्रेनिंग सेंटर सुद्धा चालू करावे.
राज्यपालांनी सर्व विषय व्यवस्थित ऐकून घेऊन सर्व विषयांबाबतीत चर्चा केली. त्यांच्या सहायकांनी सर्व विषयाची नोंद घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन व अधिकारी उपस्थित होते.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!