महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

 


महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी

घेतली व्यसनमुक्तीची शपथ


शाळा-महाविद्यालयातून व्यसनमुक्त संघाच्या उपक्रमाला राज्यभरातून प्रतिसाद

सातारा : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना व्यसनाची वाढत चाललेली प्रतिष्ठा, बीभस्तपणाचे होत असलेले प्रदर्शन आणि रात्रभर मद्यपान करण्यास सरकारकडून दिली जाणारी खुली परवानगी देशाच्या युवा पिढीसाठी व भावी पिढीसाठी घातक आहे. याचा बालमनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन नववर्षाची सुरवात "व्यसनमुक्तीची संकल्प शपथ" घेऊन करा, असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून शाळा- महाविद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त रहाण्यासाठी संकल्प शपथ घेऊन व्यसनमुक्तीचा नारा दिला आहे.


गुरूवर्य बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली गेली २५ वर्षे व्यसनमुक्तीसाठी सातत्याने झटत असलेली व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दरवर्षी ३१ डिसेंबरला "दारू नको, दूध प्या" हा उपक्रम राज्यभर राबविला जातो. 

२०२२पासून व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक विलासबाबा जवळ यांच्या संकल्पनेतून व राज्याध्यक्ष दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा-  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संकल्प शपथ देण्याचे आवाहन केले होते. यासाठी गेले २० दिवस प्रत्येक शाळेला भेटी देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते सक्रियपणे काम करीत होते. सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, संभाजीनगर, जळगाव, नाशिक, बीड, वाशिम, धाराशिव, लातूर अशा अनेक जिल्ह्यांसह मुंबई -पुणे येथील शहरी भागात असणार्‍या शाळा- महाविद्यालयातून या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला.

अनेक शाळा महाविद्यालयांमधून व्यसनमुक्त संघाचे व्याख्याते प्रा.धनंजय देशमुख, प्रा. मारुती शेळके, तानाजी पांडूळे, बाळासाहेब शेरेकर, युवावक्ते जगन्नाथ शिंदे यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.

व्यसनमुक्त युवक संघाने राबविलेल्या उपक्रमाला राज्यभरातून मिळालेला प्रतिसाद पहाता शासनाने याच्यावर गांभीर्याने विचार करायला हवा. १ जानेवारी हा नववर्षाचा प्रथम दिवस व्यसनमुक्ती संकल्प दिन म्हणून जाहीर करावा, असे आवाहन व्यसनमुक्त संघाचे मार्गदर्शक शहाजी काळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments