३१ डिसेंबरला नेमका कोणता सण आहे, ते शासनाने जनतेला सांंगावे
व्यसनमुक्त युवक संघाचे राज्य प्रवक्ते विलासबाबा जवळ यांची मागणी
सातारा : शासनाला नेमक हवं आहे काय? हे एकदा जाहीर करावे. एका बाजूला दारूबंदी व व्यसनमुक्तीचे धोरण तयार करायचे आणि दुसर्या बाजूला २४, २५ व ३१ डिसेंबरला रात्रभर दारूची दुकाने सुरू ठेवायचा निर्णय जाहीर करायचा हे हे दुर्दैवी आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राज्य करणार्या सरकारची हिच का शिवनीती आहे, असा सवाल उपस्थित करून महाराष्ट्र सरकारने ही सोंगे आणि ढोंगे बंद करावी, अशी भूमिका व्यसनमुक्त युवक संघाचे राज्य प्रवक्ते विलासबाबा जवळ यांनी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र शासन नेहमीच महसुलाच्या हव्यासापोटी दारूची उपलब्धता कमी करण्याऐवजी दारूला प्रतिष्ठा देण्याचे काम करीत आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले होते, गाव खेड्यांमध्ये समृध्दता आणायची असेल, तर नशाबंदी करणे गरजेची आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सरकार आणि लोकप्रतिनिधी यांनी गांधीजींच्या विचाराला मूठमाती देत आपल्या बगलबच्चांना दारू दुकानांच्या परवान्यांची खैरात करीत गावागावात मंदिरे कमी व मद्यालयांची संख्या अधिक अशी अवस्था करून युवा पिढीला नशेच्या खाईत लोटण्याचे पाप केले आहे. माता-भगिनींचे संसार संसार उदध्वस्त करण्याचा अधिकार या सकारला आहे का?
२४, २५ व ३१ डिसेंबर नेमका कोणता सण शासनाने जाहीर केला आहे, हे तरी जनतेला सांंगावे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अंमली पदार्थांविरोधी प्रचार करायला सांगतात. त्यांच्याच विचाराने छत्रपती श्री शिवाजी महाराज, प्रभू श्री राम यांचे हे राज्य आहे, म्हणणारे महाराष्ट्र सरकार त्यांच्या विचारांना तिलांजली देत हॅप्पी न्यु एअर साजरा करण्यासाठी जनतेने रात्रभर दारूच्या नशेत रहाण्यासाठी दुकाने पहाटे ५ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेणारे मंत्री आपल्या मुला-नातवांना याच रात्री दारू पाजतील का?
या रात्री दारूच्या नशेत होणारे खून, मारामार्या, अपघात, विनयभंग, बलात्कार या घटनांची जबाबदारी सरकार घेणार आहे का? दारूच्या दुकानांना रात्रभर परवानगी देताना पोलिस बांधवांना मात्र रात्रभर बंदोबस्ताला लावून दारू पिवून वाहन चालविणार्या चालकांवर दंडात्मक कारवाई करायला लावायची ही दुट्टपी भूमिका नाही का?
व्यसनमुक्त युवक संघ व अनेक समविचारी संघटना गेली अनेक वर्षे ३१ डिसेंबरला "दारू नको, दूध प्या" असे उपक्रम राबवित व्यसनमुक्तीच्या प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. १ जानेवारी या नववर्षदिन व्यसनमुक्ती संकल्प दिन म्हणून साजरा करीत आहे. शाळा, महाविलयांमधून विद्यार्थ्यांना संकल्प शपथ दिल्या जात आहेत. अशा उपक्रमांना सहकार्य करण्याऐवजी सरकार रात्रभर दारू प्या असा संदेश देवून काय साध्य करणार आहे. याचा विचार राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी करायला हवा.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!