महाविकास आघाडीचे
यश हे नाराजी आणि
जनक्षोभाचे प्रतिबिंब
पुणे पदवीधर विधानपरिषदेच्या पहिल्या महिला आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचे वक्तव्य
दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत,
शिक्षण-रोजगाराचे विकेंद्रीकरण करण्यावर भर
सातारा : प्रतिनिधी
पुणे पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवत विधानपरिषदेवर निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधत आपल्या विजयामागील भूमिका, निवडणुकीतील अनुभव तसेच आगामी काळातील प्राधान्यक्रम स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी, रोजगाराचे विकेंद्रीकरण आणि प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता यावर त्यांनी विशेष भर दिला. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाकडे पाहताना विरोधकांकडून विविध तर्कवितर्क केले जात असले, तरी पाचपैकी तीन जागांवर महाविकास आघाडीला मिळालेले यश हे जनतेतील नाराजी आणि जनक्षोभाचे प्रतिबिंब असल्याचे आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी सांगितले.
निवडणूक प्रचाराच्या काळात ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या वडिलांचे, प्रभाकर देशमुख यांचे सामाजिक कार्य आणि संघर्षाची शिकवण आपल्या राजकीय वाटचालीसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. प्रत्येक मतासाठी मोठी लढत होती. शिक्षक मतदारसंघात मात्र उमेदवारांची संख्या अधिक असल्याने मतांचे विभाजन झाले, असे त्यांनी सांगितले. शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणीबाबत प्रश्न उपस्थित करत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदणी झाल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारच्या बाबींवर प्रशासनाने अधिक काटेकोरपणे लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत असल्याचे सांगून हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या की, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी एमपीएससी आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन शिक्षण व स्पर्धा परीक्षांची तयारी करणे अवघड होते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी योजनांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची क्लिष्ट प्रक्रिया आणि पोर्टलवरील संथ कामकाजामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या यंत्रणेत सुलभता आणणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दुष्काळामुळे अनेक कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो. त्याचा थेट परिणाम मुलांच्या, विशेषतः मुलींच्या शिक्षणावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलींचे शिक्षण खंडित होऊ नये तसेच ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या टिकून राहावी, यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधींचे विकेंद्रीकरण करण्याची गरज असल्याचे हर्षदा देशमुख-जाधव यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक जिल्ह्यात तसेच तालुकास्तरावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र आणि रोजगार केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, करिअर, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधींबाबत स्थानिक पातळीवर मार्गदर्शन मिळावे, हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच शिक्षकांची भरती आवश्यक निकषांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे आहे. प्राथमिक शिक्षण मजबूत झाले तर पुढील शिक्षणाची पायाभरणी सक्षम होते. त्यामुळे शिक्षणाच्या मूलभूत प्रश्नांवर विधानपरिषदेत आवाज उठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या राजकीय यशाबद्दल बोलताना हर्षदा देशमुख-जाधव यांनी वडील प्रभाकर देशमुख यांच्या संघर्षाची आणि शिकवणीची भावनिक आठवण सांगितली. वडिलांच्या नावामागे लागलेली आमदारकीची नेमप्लेट आणि त्यांचा खडतर प्रवास हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. “वडिलांकडून शाबासकीची थाप मिळणे हे प्रत्येक मुलाचे मोठे सौभाग्य असते,” या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार म्हणून आगामी काळात विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार, ग्रामीण भागातील संधी आणि महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य देत काम करण्याचा निर्धार हर्षदा देशमुख-जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!