विद्यार्थ्यांमधील
‘स्पोर्ट्स टॅलेंट’ शोधण्यासाठी
सातारा पालिकेचा पुढाकार
रिमांड होममध्ये आधुनिक फिटनेस चाचणी
विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला मिळणार नवी दिशा
सातारा | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणवत्ता योग्य वेळी हेरून त्यांना शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या शाळांमध्ये ‘स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रोग्राम अँड टॅलेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत साताऱ्यातील रिमांड होममध्ये ‘प्रकल्प शक्ती’ अंतर्गत विद्यार्थ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने फिटनेस चाचणी घेण्यात आली.
या फिटनेस चाचणीमध्ये विद्यार्थ्यांची उंची, वजन, स्टँडिंग ब्रॉड जंप, काऊंटर मूव्हमेंट जंप, ३० मीटर धावणे, ४×१० मीटर शटल रन आणि हँडग्रिप यांसह विविध शारीरिक क्षमतांची तपासणी करण्यात आली. अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेची नोंद घेण्यात आली. या चाचणीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या शारीरिक क्षमतेचा वस्तुनिष्ठ डेटा उपलब्ध होणार असून, त्याच्या बलस्थानांसह कोणत्या बाबींमध्ये सुधारणा आवश्यक आहे, याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील सुप्त क्रीडा गुणांना वाव देणे आणि गुणवत्तावान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना पुढील संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, शिक्षण सभापती शंकर किर्दत, महिला व बालकल्याण सभापती मोनिका घोरपडे, नियोजन सभापती अशोक शेडगे, स्थायी समिती सदस्य सुजाता राजेमहाडिक, नगरसेवक शंकर माळवदे, नगरसेविका अनिता फरांदे व रिना भणगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी फिटनेस चाचणीची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, “विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणवत्ता योग्य वेळी हेरून त्यांना शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आधुनिक फिटनेस चाचणीमुळे विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वस्तुनिष्ठ पद्धतीने समजण्यास मदत होणार असून, त्यातून भविष्यातील गुणवत्तावान खेळाडूंचा शोध घेता येईल.”
आधुनिक तंत्रज्ञानातून क्रीडा गुणवत्तेचा शोध
‘प्रकल्प शक्ती’ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या फिटनेस चाचण्यांमधून विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता शास्त्रीय पद्धतीने तपासली जात आहे. उपलब्ध डेटाच्या आधारे विद्यार्थ्यांची बलस्थाने, कमतरता आणि आवश्यक प्रशिक्षणाची दिशा निश्चित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे योग्य क्रीडा प्रकारासाठी योग्य विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना पुढील स्तरावरील प्रशिक्षण देण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!