लाकडी दांडक्याने
मारहाणप्रकरणी आरोपीस
तीन वर्षे कारावास
१० हजार रुपये दंडाची शिक्षा
दंड न भरल्यास ३० दिवसांची साधी कैद
सातारा | प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून झालेल्या वादातून फिर्यादीच्या डोक्यात व हातांवर लाकडी दांडक्याने तसेच स्टीलच्या कड्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने तीन वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास ३० दिवसांची साधी कैद भोगावी लागणार आहे. या प्रकरणातील आरोपी तानाजी गोविंद साळुंखे (वय ४७, रा. राजापुरी, ता. जि. सातारा) याने १३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता फिर्यादीस मारहाण केल्याचा आरोप होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा राजापुरी ग्रामपंचायतीची निवडणूक आरोपीच्या पक्षाच्या विरोधात लढवत असल्याचा राग आरोपीच्या मनात होता. याच कारणावरून चिडून आरोपीने हातातील लाकडी दांडक्याने तसेच हातातील स्टीलच्या कड्याने फिर्यादीच्या डोक्याच्या डाव्या बाजूस आणि दोन्ही हातांवर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पोलीस फौजदार धनाजी ए. वायदंडे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
हा खटला मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती केतकी एम. चव्हाण, सातारा यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती वृषाली योगेश बडवे यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे तसेच साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तानाजी साळुंखे यास भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३२६ अन्वये तीन वर्षे कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल १० सप्टेंबर २०२६ रोजी सुनावण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद सोनवले (ब.नं. २६०३), महिला पोलीस हवालदार तेजा तुपे (ब.नं. १३६९) आणि महिला पोलीस हवालदार शितल भोसले (ब.नं. १९००) यांनी कामकाज पाहिले.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!