कास पुष्प पठारावर
शनिवार-रविवारी एकेरी वाहतूक
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा पोलिसांचा निर्णय
१२ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत मार्गात बदल
सातारा | प्रतिनिधी
कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम सुरू असून पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता कास परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत दर शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी कास परिसरात एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३४ अन्वये सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
कास पुष्प पठाराचा फुलांचा हंगाम १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आहे. या काळात देश-विदेशातून तसेच राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक कासला भेट देतात. सातारा-बामणोली तसेच कास धरणाकडे जाणारा प्रमुख मार्ग कास पुष्प पठार परिसरातून जात असल्याने पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्यानंतर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते.
साताऱ्याकडून कास-बामणोलीकडे जाणारी वाहतूक
साताऱ्याकडून कास पुष्प पठार, कास धरण व बामणोलीच्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहतूक सातारा – घाटाईदेवी मंदिर फाटा – वाहनतळ क्रमांक १ – घाटाईदेवी मंदिर – वाळुंजवाडी – कास धरण – बामणोली या मार्गाने वळविण्यात येणार आहे.
बामणोली-कासकडून साताऱ्याकडे येताना मार्ग बदल
बामणोली व कास धरणाच्या दिशेने साताऱ्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बामणोली – कास धरण – वाहनतळ क्रमांक २, कास पुष्प पठार – घाटाईदेवी मंदिर फाटा – सातारा या मार्गाने सोडण्यात येणार आहे.
पोलिसांचा बंदोबस्त तैनात
वाहतूक मार्गात करण्यात आलेल्या बदलांची अंमलबजावणी सुरळीतपणे करण्यासाठी संबंधित वळणाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पर्यटक, स्थानिक नागरिक तसेच वाहनचालकांनी वाहतूक मार्गातील या बदलांची नोंद घेऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम लक्षात घेता मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी, वाहनांची गर्दी आणि पर्यटकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी करण्यात आलेली ही एकेरी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे. पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून निर्धारित मार्गानेच प्रवास करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!