कृष्णा सहकारी बँकेला राज्यातील सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार; ५०१ ते १००० कोटी ठेवींच्या गटात मानाचा बहुमान; १२ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे पुरस्कार वितरण


कृष्णा बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

५०१ ते १००० कोटी ठेवींच्या गटात मानाचा बहुमान

छत्रपती संभाजीनगर येथे १२ सप्टेंबरला पुरस्कार वितरण

कराड | प्रतिनिधी

ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यावसायिक आणि उद्योजकांना भक्कम आर्थिक आधार देणाऱ्या कृष्णा सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनतर्फे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कृष्णा सहकारी बँकेला ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्काराचा प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. ५०१ कोटींपेक्षा अधिक आणि १००० कोटी रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या सहकारी नागरी बँकांच्या गटातून कृष्णा बँकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

या पुरस्काराचे वितरण १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील सुंदरवाडी परिसरातील ‘एक्सप्रेस इन हेरिटेज’ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

राज्यातील सहकारी नागरी बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनकडून दरवर्षी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँकांचा विविध निकषांच्या आधारे गौरव केला जातो. आर्थिक शिस्त, ग्राहक सेवा, व्यवसायवृद्धी, तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक कारभार आणि एकूणच बँकेची कार्यक्षमता यांचा विचार करून पुरस्कारासाठी बँकांची निवड केली जाते. यंदा कृष्णा सहकारी बँकेने आपल्या कामगिरीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली बँकेचा विस्तार

कृष्णा सहकारी बँकेने चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षांत आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करत आधुनिक बँकिंगकडे प्रभावी वाटचाल केली आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन बँकेने नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला असून, मोबाईल बँकिंगसह विविध डिजिटल बँकिंग सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

सध्या कृष्णा सहकारी बँक सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये २७ शाखा आणि एका विस्तारित कक्षाच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देत आहे. बँकेच्या वाढत्या कार्यक्षमतेची दखल घेत रिझर्व्ह बँकेने ठाणे, सोलापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये कार्यविस्तारास नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात बँकेच्या विस्ताराला आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे.

ग्राहकहिताला केंद्रस्थानी ठेवून वाटचाल

ग्राहक सेवा, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या चतु:सूत्रीवर कृष्णा बँकेने आपल्या कामकाजाची दिशा निश्चित केली आहे. पारंपरिक सहकारी बँकिंगची विश्वासार्हता कायम ठेवतानाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक गतिमान आणि सुलभ सेवा देण्यावर बँकेचा भर आहे.

बँकेच्या या कामगिरीमुळे सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार कृष्णा सहकारी बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीची आणि विश्वासार्हतेची पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बँकेचे सभासद, संचालक मंडळ, ग्राहक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या पुरस्कारामुळे कृष्णा सहकारी बँकेच्या आगामी विस्तार आणि विकासाच्या वाटचालीला निश्चितच नवी ऊर्जा मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments