ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी प्रभावीपणे काम करा : मंत्री जयकुमार गोरे; ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाचे महाबळेश्वर येथे दोनदिवसीय उच्चस्तरीय कार्यशाळा

ग्रामीण विकासाला नवी दिशा

देण्यासाठी प्रभावीपणे काम

करा : मंत्री जयकुमार गोरे

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाचे महाबळेश्वर येथे दोनदिवसीय उच्चस्तरीय कार्यशाळा

महाबळेश्वर | प्रतिनिधी

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी ग्रामपंचायती सक्षम करणे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि प्रशासकीय यंत्रणेत समन्वय वाढविणे आवश्यक आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाच्या माध्यमातून सक्षम ग्रामपंचायत, प्रभावी प्रशासन आणि लोकसहभागाच्या बळावर समृद्ध ग्रामीण महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने अधिक परिणामकारकपणे काम करा, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसह ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांना अधिक गती देण्यासाठी महाबळेश्वर येथे आयोजित दोनदिवसीय उच्चस्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी राज्यातील ग्रामीण विकासाच्या कामकाजाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आगामी काळातील नियोजन आणि अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.या कार्यशाळेस राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित आहेत.

कार्यशाळेच्या प्रारंभी मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाच्या जिल्हानिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. अभियानांतर्गत निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे, आतापर्यंत झालेली कार्यवाही, उद्दिष्टपूर्तीची स्थिती तसेच अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या प्रशासकीय अडचणी याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

अभियानाची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. ज्या ठिकाणी अंमलबजावणीमध्ये अडथळे येत आहेत, ते दूर करण्यासाठी विभागीय पातळीवर आवश्यक समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.

ग्रामीण विकासाच्या दृष्टीने सन २०२६-२७ मधील उद्दिष्टे आणि त्यासाठी करावयाच्या कार्यवाहीचे नियोजन हा कार्यशाळेतील महत्त्वाचा विषय आहे. आगामी वर्षात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून विकासकामांना अधिक गती देताना स्थानिक गरजा, उपलब्ध संसाधने आणि शासनाच्या विविध योजनांचा योग्य समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावर विविध योजनांची अंमलबजावणी करताना विभागांमध्ये समन्वय राहणे आवश्यक असून, योजनांचा केवळ कागदोपत्री आढावा न घेता त्याचा प्रत्यक्ष परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचतो आहे का, यावरही लक्ष केंद्रित करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

ग्रामीण विकासाची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी ग्रामपंचायती सक्षम असणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवरील समस्या आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देणे, उपलब्ध निधीचा परिणामकारक वापर करणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यावर भर देण्यात आला.

ग्रामपंचायतींना केवळ योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा न ठेवता स्थानिक विकासाचे प्रभावी केंद्र म्हणून विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचेही सांगितले. विकास योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांची निवड, योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करणे आणि कामांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे या बाबींवर प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 

सक्षम ग्रामपंचायत, प्रभावी प्रशासन आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याचे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय यंत्रणेने योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान आणि परिणामकारक करण्याची आवश्यकता आहे.

महाबळेश्वर येथील या दोन दिवसीय कार्यशाळेत राज्यातील जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत स्तरावरील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाल्याने जिल्हानिहाय अनुभवांची देवाणघेवाण आणि आगामी कामकाजाचे अधिक प्रभावी नियोजन होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानाला अधिक गती देण्यासाठी ही उच्चस्तरीय कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments