‘डॉल्बी-लेझर’वर
पोलिसांचा लगाम
गणेश मंडळांवर पहिली कारवाई
पाटखळमध्ये बीम लाईट व डॉल्बीचा वापर
डबेवाडीत विनापरवाना डीजेसह मिरवणूक, दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
सातारा | प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पाटखळ येथे गणपती आगमन मिरवणुकीत लेझर बीम लाईट व डॉल्बी सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी, तर डबेवाडी येथे कोणतीही परवानगी न घेता डीजे साऊंडसह गणेशमूर्ती आगमन मिरवणूक काढल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेशोत्सव शांततेत व नियमांचे पालन करून साजरा करण्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केलेले आवाहन असतानाच ही कारवाई झाल्याने नियमभंग करणाऱ्या मंडळांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री आठ ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास पाटखळ (ता. सातारा) येथे श्री संत गाडगे महाराज मित्र गणेशोत्सव मंडळाच्या गणपती आगमन मिरवणुकीत लेझर बीम लाईट आणि डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यात आला. याबाबत कॉन्स्टेबल संदीप फणसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंडळाचे अध्यक्ष रुपेश रविंद्र सोनटक्के यांच्यासह सिद्धांत प्रकाश सोनटक्के, रजत अनिल सोनटक्के, हणमंत मधुकर सोनटक्के, नवनाथ श्रीरंग सोनटक्के, गणेश रघुनाथ सोनटक्के आणि प्रणय लहु सोनटक्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच लेझर बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी त्याचा मालक अभिजीत संतोष पवार (रा. चिंचणी, ता. सातारा) आणि डॉल्बी मालक रजनीकांत नागे (पूर्ण नाव उपलब्ध नाही, रा. पोलिस मुख्यालयाशेजारी, सातारा) यांचाही गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार प्रविण वायदंडे करीत आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या ३ सप्टेंबर रोजीच्या आदेशानुसार लेझर वापराबाबत निर्बंध लागू करण्यात आले होते. तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्याकडून संबंधितांना ६ सप्टेंबर रोजी कलम १६८ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दरम्यान, डबेवाडी (ता. सातारा) येथेही १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोणतीही परवानगी न घेता डीजे साऊंडसह गणेशमूर्ती आगमन मिरवणूक काढण्यात आली. याप्रकरणी हवालदार प्रदीप मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंडळाचे अध्यक्ष मयुर माने यांच्यासह आकाश चव्हाण, सुमित माने, विशाल माने, प्रज्वल माने आणि अनिकेत माने (सर्व रा. डबेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातही ६ सप्टेंबर रोजी बजावण्यात आलेल्या नोटिशीचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार चंद्रकांत माने करीत आहेत.
नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपक, डीजे, डॉल्बी, लेझर बीम तसेच मिरवणुकीसंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि नियमांच्या चौकटीत साजरा करण्याचे आवाहन केले होते.
मात्र, नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू करण्यात आली आहे. आगामी काळातील गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकांमध्येही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सातारा तालुका पोलिसांनी दिला आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!