कास पठारावर १० सप्टेंबरपासून
फुलांची रंगत वाढणार
उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांची माहिती
पर्यटकांसाठी तीन नवीन व्ह्यू पॉईंट्ससह विविध सुविधा
सातारा | प्रतिनिधी
कास पठाराच्या निसर्गसौंदर्याची आणि रंगीबेरंगी फुलांची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कास पठार फुलोत्सव हंगाम २०२६ ला मंगळवार, १ सप्टेंबरपासून अधिकृत सुरुवात होत असून पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी वन विभाग सज्ज झाला आहे. पठारावर सध्या चार ते पाच प्रकारची फुले उमलली असून १० सप्टेंबरपासून विविध प्रजातींच्या फुलांचा बहर अधिक खुलण्यास सुरुवात होईल, अशी माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
यंदाच्या हंगामात पर्यटकांना कास पठाराचा निसर्ग अधिक जवळून अनुभवता यावा, यासाठी वन विभागाकडून विविध नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंडपघळ, कास लेक व्ह्यू पॉईंट आणि कनेर व्ह्यू पॉईंट असे तीन नवीन व्ह्यू पॉईंट विकसित करण्यात आले आहेत. या ठिकाणी पर्यटकांना परिसरातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता यावा यासाठी दुर्बिणींची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे. स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून महिलांसाठी पहिल्यांदाच ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात आला आहे. त्यामुळे महिला पर्यटकांना अधिक सुरक्षित व सोयीस्कर वातावरण मिळणार आहे.
कास पठार परिसरात नेटवर्कची समस्या ही पर्यटकांसाठी नेहमीच अडचणीची ठरत होती. ऑनलाइन पेमेंट तसेच आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे सुलभ व्हावे, यासाठी वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा वन विभागाचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय पर्यटकांसाठी नवीन ‘सुविनीय शॉप’ सुरू करण्यात आले आहे.
पठारावर येणाऱ्या पर्यटकांना काससह परिसरातील इतर पर्यटनस्थळांची माहिती मिळावी तसेच महत्त्वाच्या सूचना वेळेत देता याव्यात, यासाठी पार्किंगसह विविध ठिकाणी तीन ते चार लाऊडस्पीकर्सची ध्वनिक्षेपक प्रणाली बसविण्यात आली आहे.
कास पठार हे केवळ पर्यटनस्थळ नसून जैवविविधतेने समृद्ध असलेला संवेदनशील परिसर आहे. त्यामुळे पर्यटकांनी फुलांना हात लावणे, तोडणे किंवा परिसरात कचरा करणे टाळावे. निसर्गाचा आनंद घेताना स्वच्छता राखावी, कचरा करू नये आणि कास पठाराचे नैसर्गिक सौंदर्य व जैवविविधता अबाधित ठेवण्यासाठी वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे.
१० सप्टेंबरनंतर फुलांचा बहर वाढणार असल्याने पुढील काळात कास पठारावर पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी वन विभागाच्या नियमांचे पालन करून कासच्या निसर्गसंपदेचा जबाबदारीने आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!