कासच्या फुलोत्सवासाठी
२७ गाइड्स,१७० मजूर तैनात
वाहतूक व्यवस्थेसाठी ‘नो स्टॉपिंग झोन’
क्षेत्रीय वनपाल संदीप झोपाळे यांची माहिती
येत्या दहा दिवसांत तेरडा, अबोलिमाचा बहर
सातारा | प्रतिनिधी
कास पठारावरील फुलोत्सव हंगामासाठी वन विभागाने पर्यटकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून पर्यटकांना मार्गदर्शन व सुरक्षेसाठी २७ प्रशिक्षित गाइड्स आणि गर्दी नियंत्रणासाठी तब्बल १७० मजूर तैनात करण्यात आले आहेत. २७ ऑगस्ट रोजी २७ गाइड्सचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मजुराला गर्दी नियंत्रण, पर्यटकांची सुरक्षितता आणि विविध व्यवस्थापनाची विशिष्ट जबाबदारी सोपविण्यात आली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप झोपाळे यांनी दिली.
कास पठारावर पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेतही विशेष बदल करण्यात आले आहेत. गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘नो स्टॉपिंग झोन’, एकेरी वाहतूक व्यवस्था आणि ई-व्हेईकलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पठारावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी पठारावर पिण्याचे पाणी, बसण्यासाठी बेंचेस आणि सेल्फी पॉईंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय ‘मंडपघळ’ हे नवीन आकर्षण विकसित करण्यात आले असून पर्यटकांना कास परिसरातील निसर्गाचा वेगळा अनुभव घेता येणार आहे.
कास पठारावर सध्या चवर, स्मिती यांसह चार ते पाच प्रकारची फुले उमलण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दहा दिवसांत तेरडा, अबोलिमा यांसारख्या फुलांचा बहर पूर्णपणे खुलण्याची शक्यता आहे. कास पठाराचे एक वैशिष्ट्य म्हणजे दर आठवड्याला फुलांच्या प्रजाती आणि रंगांची छटा बदलत जाते. त्यामुळे संपूर्ण हंगामात पर्यटकांना निसर्गाचे वेगवेगळे रंग अनुभवता येतात. कास पठाराची जैवविविधता आणि फुलांचे नैसर्गिक अधिवास अबाधित ठेवणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. कास पठार आपलेच समजून त्याचे जतन व संरक्षण करावे आणि भावी पिढ्यांसाठी ही निसर्गसंपदा सुरक्षित ठेवावी, असे आवाहन क्षेत्रीय वनपाल संदीप झोपाळे यांनी केले.
पठारावर ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या ‘काय करावे आणि काय करू नये’ (Do’s and Don’ts) या माहिती फलकांवरील सूचनांचे पर्यटकांनी काटेकोरपणे पालन करावे. परिसरात कचरा टाकू नये, फुलांना किंवा वनस्पतींना कोणतीही हानी पोहोचवू नये आणि कासचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी वन विभागाला सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!