महाबळेश्वरच्या द्विशताब्दी
वर्षात शहर संस्थापक
छत्रपती प्रतापसिंह
महाराजांचे स्मारक
उभारावे
छत्रपती वृषालीराजे भोंसले यांचे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना निवेदन
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर शहराच्या द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शहराचे संस्थापक छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे यथोचित स्मारक महाबळेश्वर शहरात उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन छत्रपती वृषालीराजे भोंसले यांनी महाबळेश्वरचे नगराध्यक्ष श्री. सुनील शिंदे यांना दिले.
महाबळेश्वर शहराच्या निर्मितीमध्ये छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे असलेले योगदान, त्यांची दूरदृष्टी आणि शहराच्या उभारणीचा इतिहास भावी पिढ्यांसमोर यावा, तसेच देश-विदेशातून महाबळेश्वरला भेट देणाऱ्या लाखो पर्यटकांना या शहराच्या संस्थापकाची ओळख व्हावी, हा स्मारक उभारण्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच शहरसंस्थापक छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी ठामपणे प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी, नगरसेवक रोहित ढेबे, नगरसेवक अफजल सुतार, नगरसेविका सुनीता वाडकर, इतिहास अभ्यासक निलेश झोरे, संतोष शिंदे आणि विक्रम क्षीरसागर उपस्थित होते.
महाबळेश्वरच्या द्विशताब्दी वर्षात शहरसंस्थापक छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे स्मारक उभारणे हे केवळ एका महान राजाला अभिवादन ठरणार नसून, त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या शहराच्या इतिहासाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे कार्य ठरेल. या ऐतिहासिक पर्वात शहरसंस्थापकाला यथोचित सन्मान मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!