वर्णे–निगडी एमआयडीसीविरोधी
आंदोलनाला नवे बळ
राजू शेट्टींच्या उपस्थितीत एल्गार सभेची तयारी
सुपीक शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा निर्धार
पुढील आठवड्यात वर्णे येथे सभा, लॉंगमार्चचीही तयारी
सातारा | प्रतिनिधी
वर्णे–निगडी परिसरातील सुपीक शेती एमआयडीसीसाठी जाण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने आता निर्णायक वळण घेतले आहे. आगामी लॉंगमार्चच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील आठवड्यात वर्णे येथे विराट एल्गार सभा घेण्याची तयारी सुरू झाली आहे.
धनगरवाडी येथे झालेल्या एल्गार सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी ही घोषणा केली. राज्यातील विविध पक्षांचे नेते, शेतकरी संघटना तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनाही आंदोलनात सहभागी करून घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेला पंचक्रोशीतील शेतकरी, महिला, युवक, आजी-माजी सैनिक आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. एमआयडीसीसाठी सुपीक शेती संपादित करण्यास विरोध करत उपस्थितांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
राजू शेळके म्हणाले, “हा लढा केवळ जमिनीचा नसून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा आणि भावी पिढ्यांच्या भविष्याचा आहे. शेतकरी आणि सैनिक बांधवांची साथ शेवटपर्यंत सोडणार नाही.”
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सचिव प्रवीण धसके यांनी महिलांची मोठी उपस्थिती हे आंदोलनाचे बळ असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा व्यक्त केला.
दरम्यान, 3 मे 2013 रोजीच्या एमआयडीसी अधिसूचनेच्या प्रक्रियेवरही सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले. तेरा वर्षांनंतर या प्रकल्पासाठी प्रशासनाकडून हालचाली का सुरू झाल्या, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली.
आंदोलनाच्या पुढील टप्प्यात सामाजिक परिणाम मूल्यांकनासाठी स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंचनासाठी झालेला खर्च, सुपीक शेती, फळबागा, भाजीपाला उत्पादन, भूजल, पर्यावरण, जैवविविधता, पुनर्वसन आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर होणारा संभाव्य परिणाम याबाबतचा अहवाल शासनासमोर मांडण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
वर्णे येथे होणाऱ्या आगामी एल्गार सभेनंतर आंदोलनाची पुढील दिशा आणि लॉंगमार्चची रूपरेषा स्पष्ट होणार असून, एमआयडीसीविरोधातील हा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!