नंदकुमार जगताप यांचे निधन
शिपाई पदापासून मुख्याध्यापकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
कुडाळ| प्रतिनिधी
शिक्षणाची जिद्द, प्रामाणिक मेहनत आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ याच्या जोरावर शिपाई पदापासून आपल्या सेवेला सुरुवात करून शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून उल्लेखनीय कार्य करणारे नंदकुमार जगताप सर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सायगाव परिसरासह कोयना एज्युकेशन सोसायटी परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.
सामान्य कुटुंबातून आलेल्या जगताप सरांनी प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता शिक्षण पूर्ण केले. नोकरीसोबत शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवत त्यांनी शिक्षकपद मिळवले आणि पुढे मुख्याध्यापक म्हणूनही जबाबदारी पार पाडली. त्यांच्या जीवनातील हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसह तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला.
दुर्गम भागातील शाळांमध्ये सेवा बजावताना त्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते शिक्षण मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला. सायगाव, तळदेव, कुंभरोशी, दापवडी आणि वाघावळे-उचाट परिसरातील शाळांमध्ये त्यांनी निष्ठेने काम केले.
इतिहास विषयावर प्रभुत्व असलेल्या जगताप सरांची प्रभावी वक्तृत्वशैली आणि उत्तम सूत्रसंचालन यामुळे शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांना विशेष मागणी असायची. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ते पालकांशी सातत्याने संपर्क ठेवत. गरज भासल्यास स्वतः विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिस्थितीची माहिती घेत मार्गदर्शन करण्याची त्यांची पद्धत होती.
शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन विविध उपक्रम राबविण्यातही त्यांचा पुढाकार असे. हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी सहकारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आपुलकीचे नाते निर्माण केले होते.
एक सामान्य कर्मचारी ते आदर्श शिक्षक आणि मुख्याध्यापक असा प्रवास करणारे नंदकुमार जगताप सर यांच्या निधनाने एक समर्पित शिक्षणसेवक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. कोयना एज्युकेशन सोसायटी परिवार, माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!