रस्ता रजिस्टर’मध्ये नोंदच नाही; तरी काँक्रीटीकरण कसे? कुडाळ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात दत्तात्रय शिंदे आक्रमक; अडवण्यात आलेला रस्ता खुला करून मिळावा

रस्ता रजिस्टर’मध्ये

नोंदच नाही; तरी 

काँक्रीटीकरण कसे?

कुडाळ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात दत्तात्रय शिंदे आक्रमक

अडवण्यात आलेला रस्ता खुला करून मिळावा

कुडाळ | प्रतिनिधी

ग्रामपंचायत कुडाळ येथील ‘व्यायाम शाळेसमोरील रस्ता काँक्रीटीकरण करणे’ या ४६ हजार ९०० रुपयांच्या कामाबाबत उपलब्ध शासकीय अभिलेख आणि माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या रस्त्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद, जागेच्या मालकी हक्कातील तफावत, करारनाम्यातील बाबी, मोजमाप पुस्तिका तसेच बिल व देयक प्रक्रियेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थ दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

या प्रकरणी पंचायत समिती जावळीच्या विस्ताराधिकाऱ्यांकडून २९ जुलै रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी व मोजमाप करण्यात आले. मात्र, अद्याप अंतिम चौकशी अहवाल तयार झालेला नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या लेखी माहितीनुसार, संबंधित रस्त्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निधीतून या रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना रस्त्याची अधिकृत नोंद आणि जागेचा मालकी हक्क कोणत्या आधारावर निश्चित करण्यात आला, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. २९ जुलै रोजी झालेल्या स्थळ पाहणीदरम्यान काँक्रीटीकरण झालेली जागा तसेच ग्रामपंचायत मालकीची सिटी सर्व्हे नं. ७९३ असलेल्या जागेची पाहणी व मोजमाप करण्यात आले. या दोन्ही जागांमध्ये तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सदर रस्ता प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरच आहे का, याची अधिकृत शासकीय मोजणी करून मालकी हक्क निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी रजनीकांत गायकवाड यांनी संबंधित जागा ग्रामपंचायत मालकीची असल्याचे दप्तरी नमूद असल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. तर विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी उमेश जाधव यांनी माहिती अधिकारातून दिलेल्या माहितीत संबंधित रस्त्याची अभिलेखात नोंद नसल्याचे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले आहे. या परस्परविरोधी बाबींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार या कामासाठी स्वप्नील चंद्रकांत गवळी यांची ठेकेदार म्हणून नियुक्ती झाल्याचे नमूद आहे. मात्र उपलब्ध कागदपत्रांमध्ये कोऱ्या स्टॅम्प पेपरवर ठेकेदाराची स्वाक्षरी जोडलेली असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. या स्वाक्षरीबाबत बनावटपणाचा कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नसला, तरी संबंधित स्टॅम्प पेपर, करारनामा, ठेकेदाराची स्वाक्षरी, निविदा कागदपत्रे आणि इतर अभिलेखांची सक्षम यंत्रणेमार्फत सत्यता तपासावी, अशी मागणी केली आहे.

या कामाची मोजमाप पुस्तिका उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असून त्यावर तत्कालीन सरपंच सुरेखा निवृत्ती कुंभार आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी रविकांत संपकाळ यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे मोजमाप पुस्तिकेत नमूद केलेली रस्त्याची लांबी, रुंदी, काँक्रीटची जाडी, वापरलेले साहित्य आणि प्रत्यक्ष कामाचे प्रमाण यांची स्थळावरील कामाशी प्रत्यक्ष पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच कामाचे बिल अदा झाले असल्यास त्याची मूळ प्रत, बिल क्रमांक व दिनांक, बिलाची रक्कम, ठेकेदाराचा जीएसटी तपशील, बँक खाते, व्हाउचर, देयक मंजुरी आणि चेक व्यवहाराची संपूर्ण माहिती तपासण्याची मागणीही केली आहे. चौकशी अहवालाबाबत विचारणा केली असता ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा जवाब अद्याप प्राप्त झालेला नसल्याने अहवाल तयार झालेला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. एका अधिकाऱ्याचा जवाब प्रलंबित असल्यामुळे प्रत्यक्ष स्थळ पाहणी, मोजमाप आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे झालेली चौकशी पुढे का नेली जात नाही, असा सवाल आता उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणी २७ जानेवारी २०२६ रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. संबंधित अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी किंवा इतर व्यक्ती दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. मात्र, या तक्रारीवर नेमकी कोणती कार्यवाही झाली, चौकशी कुठपर्यंत आली आणि जबाबदारी कोणावर निश्चित झाली, याबाबत समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

दोषारोप नव्हे, निष्पक्ष चौकशी हवी’

या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही व्यक्तीला पूर्वीच दोषी ठरविण्याचा उद्देश नसून सार्वजनिक निधीचा योग्य विनियोग झाला का, काम मंजूर आराखड्यानुसार झाले का, जागेचा मालकी हक्क काय आहे आणि कागदपत्रे नियमबद्ध आहेत का, हे निष्पक्ष चौकशीतून स्पष्ट व्हावे. २९ जुलै रोजी प्रत्यक्ष पाहणी व मोजमाप झाल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी विस्ताराधिकारी, पंचायत समिती जावळी यांच्याकडे पाच पानी निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये स्थळ पाहणी, मोजमाप, सिटी सर्व्हे नं. ७९३ मधील तफावत, रस्ता रजिस्टर, करारनामा, मोजमाप पुस्तिका, बिल आणि देयक प्रक्रियेची सविस्तर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

श्री. दत्तात्रय शिंदे

Post a Comment

0 Comments