सायबर फसवणुकीतील
82,500 रुपये परत
उंब्रज पोलिसांची तत्पर कारवाई
काही तासांत 100 टक्के रक्कम मिळवून दिली
कराड | प्रतिनिधी
ऑनलाईन फसवणुकीत गमावलेली 82 हजार 500 रुपयांची संपूर्ण रक्कम अवघ्या काही तासांत परत मिळवून देत उंब्रज पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पेट्रोल स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवून एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली होती.
उंब्रज, ता. कराड येथील अनुज संजय नगाने यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. 2 ऑगस्ट रोजी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून पेट्रोल स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवले. पेट्रोलसाठी फिर्यादीच्या WhatsApp वर स्कॅनर पाठवून त्यावर पैसे पाठविण्यास सांगण्यात आले. या आमिषाला बळी पडून नगाने यांनी एकूण 82,500 रुपये ऑनलाइन पाठविले. मात्र पैसे मिळाल्यानंतर संबंधिताने पेट्रोल दिले नाही तसेच पैसेही परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नगाने यांनी तातडीने उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी विलंब न करता तांत्रिक तपास सुरू केला. सातारा सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने संबंधित बँक खात्यांशी तातडीने संपर्क साधून फसवणुकीच्या व्यवहारावर ट्रान्झॅक्शन फ्रीज करण्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतर फिर्यादीच्या बँकेशी आवश्यक पत्रव्यवहार करून फसवणुकीतील 82,500 रुपयांची 100 टक्के रक्कम फिर्यादीला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईमुळे सायबर फसवणूक झाल्यानंतर वेळ न दवडता पोलिसांशी संपर्क साधल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या आदेशाने करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल निलम वैराट यांनी सातारा सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांच्या मदतीने ही कारवाई केली.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन
डिजिटल व्यवहार वाढत असताना सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये. अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये, बँक खाते क्रमांक, OTP, PIN किंवा अन्य गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!