अंत्योदय योजनेच्या साखरेचा काळाबाजार? साताऱ्यात २०७ किलो साखर जप्त; स्वामी समर्थ स्टोअर्सवर पुरवठा विभागाची धाड; गरीबांच्या हक्काच्या साखरेचा गैरवापर झाल्याचा संशय

अंत्योदय योजनेच्या साखरेचा

काळाबाजार? साताऱ्यात 

२०७ किलो साखर जप्त

स्वामी समर्थ स्टोअर्सवर पुरवठा विभागाची धाड

गरीबांच्या हक्काच्या साखरेचा गैरवापर झाल्याचा संशय

सातारा : प्रतिनिधी

गोरगरीब, कष्टकरी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना अन्नसुरक्षा मिळावी, या उद्देशाने शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेतील साखरेचा कथित गैरवापर समोर आला आहे. सातारा शहरातील स्वामी समर्थ स्टोअर्स या दुकानावर पुरवठा विभागाने धाड टाकून तब्बल २०७ किलो साखर जप्त केली आहे. अंत्योदय योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यासाठी असलेली साखर दुकानात आढळून आल्याने सातारा शहरात खळबळ उडाली आहे.

अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचा मुख्य उद्देश समाजातील सर्वात गरीब कुटुंबांना अन्नसुरक्षा उपलब्ध करून देणे आणि भूक व कुपोषण कमी करणे हा आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत पात्र कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार अनुदानित दरात अन्नधान्य व इतर शिधा उपलब्ध करून दिला जातो. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दरमहा नियमानुसार अन्नधान्याचा लाभ मिळतो. तसेच महाराष्ट्रात अंत्योदय कुटुंबांना अनुदानित दरात साखरेचा लाभ दिला जातो.

सातारा शहरातील झोपडपट्टी भागातील गरीब मजूर, रिक्षाचालक, कचरा वेचक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील अनेक नागरिक या योजनेचा लाभ घेतात. त्यामुळे अंत्योदय योजनेच्या शिध्याचा अपहार किंवा गैरवापर झाल्यास त्याचा थेट परिणाम समाजातील सर्वात गरजू घटकांवर होतो. सहाय्यक पुरवठा अधिकारी भरत तुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा शाखेतील कनिष्ठ लिपिक उमेश उदागे आणि निलेश गायकवाड यांनी पंचांसमक्ष कारवाई करून अंत्योदय योजनेच्या वाटपासाठी असलेली २०७ किलो साखर जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. जप्त करण्यात आलेली साखर संबंधित दुकानात नेमकी कशी पोहोचली, तिचा पुरवठा कोणामार्फत करण्यात आला, कोणत्या वाहनातून ती आणण्यात आली आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबत आता तपासाची गरज निर्माण झाली आहे.

सातारा शहर परिसरात हजारो कुटुंबे अंत्योदय योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिध्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे या योजनेतील साखर इतरत्र आढळून येणे ही गंभीर बाब असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. गरीबांच्या हक्काचा शिधा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याऐवजी अन्यत्र वळविला जात असेल, तर संबंधित यंत्रणांनी संपूर्ण साखळीचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती देणाऱ्या किंवा तक्रारदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न काही समाजकंटक व राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तींकडून होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी होणे आवश्यक असून, तक्रारदार किंवा माहितीदारांवर दबाव आणला जात असल्यास त्याचीही गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.जप्त केलेली साखर केवळ एका दुकानापुरती मर्यादित आहे की त्यामागे मोठी साखळी कार्यरत आहे, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.

पुरवठा विभागाने जप्तीची कारवाई केली असली तरी साखरेचा मूळ पुरवठा, वितरणाची नोंद, संबंधित शिधापत्रिकाधारकांना प्रत्यक्षात किती साखर वितरित झाली आणि उर्वरित साखर दुकानात कशी आली, या सर्व बाबींची पडताळणी होणे महत्त्वाचे ठरणार आहे. गरीबांच्या हक्काचा शिधा कोणत्याही परिस्थितीत वळविला जाऊ नये. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सातारा शहरातील गरीब व कष्टकरी नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments