NEET पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ कराडमध्ये काँग्रेसचे भर पावसात आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

NEET पेपर घोटाळ्याच्या

निषेधार्थ कराडमध्ये काँग्रेसचे

भर पावसात आंदोलन

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

कराड | प्रतिनिधी

देशभर चर्चेत असलेल्या NEET पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कराड शहर काँग्रेसच्या वतीने दत्त चौक येथे भर पावसात तीव्र आंदोलन करण्यात आले. "धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या", "मोदी सरकारचा निषेध असो", "विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी काही काळ रास्ता रोको करून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त केला.

यावेळी बोलताना काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "देशातील विद्यार्थी आणि युवकांनी शांततेच्या मार्गाने दिल्लीत आंदोलन केले असताना त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले असता त्यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांना अटक करण्यात आली. ही घटना लोकशाहीसाठी घातक असून केंद्र सरकारची हुकूमशाही वृत्ती देशाला अराजकतेकडे नेत आहे. विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्यांवरील अन्यायाविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करत राहील."

जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पवार यांनीही सरकारवर टीका करत म्हटले की, "NEET पेपर घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. युवक काँग्रेस विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अधिक तीव्र आंदोलन उभारेल."

भर पावसातही काँग्रेस व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ दत्त चौक परिसरात वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी बंदोबस्त ठेवला होता.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पवार, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, रवी बडेकर, कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष बाबुराव पवार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमित जाधव, प्रदेश प्रतिनिधी झाकीर पठाण, एससी काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, प्रवीण वेताळ, दिग्विजय सूर्यवंशी, देवदास माने, चैतन्य पाटील, समीर इनामदार, वसीम इनामदार, दिग्विजय जमाले, महेश पवार, तुषार लोंढे, शानूर देसाई, अजित पवार, रविराज पाटील, संग्राम काळभोर, मुकुंद पाटील, विक्रम पाटील, प्रतिक निकम, नितीन पाटील, मुबीन बागवान, उमर सय्यद, गणेश सूर्यवंशी, प्रदीप जाधव, सुरेश भोसले, युवराज कुंभार, अक्षय सुर्वे, अमोल जाधव, शाहरुख मुल्ला, सचिन पाटील यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस सेल आणि एससी काँग्रेस सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

विद्यार्थिनीच्या फलकाने वेधले सर्वांचे लक्ष

आंदोलन सुरू असताना रस्त्यावरून जाणाऱ्या काही महिला आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी एका विद्यार्थिनीने "आमचे भविष्य सुरक्षित करा" असा फलक हातात घेऊन आंदोलनात सहभाग नोंदविला. तिच्या या फलकाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत निर्माण झालेली चिंता आणि असुरक्षिततेची भावना या माध्यमातून अधोरेखित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments