'किसन वीर' कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय व्हॅट भरणा सन्मान

'किसन वीर' कारखान्याला

सलग दुसऱ्या वर्षी

राज्यस्तरीय व्हॅट

भरणा सन्मान

पारदर्शक कारभार आणि आर्थिक शिस्तीची राज्य शासनाकडून दखल

वाई | प्रतिनिधी : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाच्या राज्य वस्तू व सेवा कर (GST) विभागामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षातील सर्वाधिक व्हॅट (कर) भरणा आणि कर कायद्यांचे काटेकोर पालन केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, हा राज्यस्तरीय सन्मान कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला आहे.

वाई, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा, जावळी आणि कोरेगाव या सहा तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील किसन वीर कारखाना आर्थिक अडचणीत असताना कोणत्याही बँकेचे वित्तसहाय्य उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील आणि खासदार नितीनकाका पाटील यांनी कारखान्याची धुरा सांभाळत शेतकरी, वाहनमालक आणि व्यापाऱ्यांची सर्व देणी मागील चार वर्षांत नियमितपणे अदा केली. तसेच शासनाची देणीही वेळेत भरल्यामुळे कारखान्याला हा सन्मान प्राप्त झाला.

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले की, कारखान्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर मंत्री मकरंदआबा पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. व्यवस्थापनाने आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि आवश्यक सुधारणा राबवल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्व संबंधित घटकांचा कारखान्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

ते पुढे म्हणाले की, कोणत्याही बँकेच्या अर्थसहाय्याशिवाय मागील चार वर्षांतील ऊसबिलाची संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली आहे. याशिवाय जीएसटी, आयकर, व्हॅट, कामगारांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि इतर सर्व शासकीय कर नियमित भरून कारखान्याने आर्थिक शिस्तीचे उदाहरण निर्माण केले आहे. सलग दुसऱ्या वर्षी मिळालेला हा पुरस्कार म्हणजे शेतकऱ्यांच्या विश्वासाचा आणि कारखान्याच्या सक्षम व्यवस्थापनाचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य कर सहआयुक्त प्रज्ञा पांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, संचालक संदीप चव्हाण आणि मुख्य लेखाधिकारी आर. जी. उन्हाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

दरम्यान, हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाल्याबद्दल मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे आणि संचालक मंडळाने कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments