प्रतापगडावर उभारणार वीर जिवाजी महाले यांचा पूर्णाकृती पुतळा; भव्य स्मारकाला तत्त्वतः मंजुरी
शिवेंद्रसिंहराजे आणि शंभुराजे देसाई यांच्या संयुक्त बैठकीत महत्त्वाचा निर्णय
स्मारकासाठी निधी उपलब्ध करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी अंगरक्षक आणि अफजलखान वधाच्या ऐतिहासिक प्रसंगात अतुलनीय शौर्य गाजवून स्वराज्याचे रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांच्या स्मरणार्थ किल्ले प्रतापगडावर पूर्णाकृती पुतळा आणि भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
बैठकीत प्रतापगड परिसरातील पर्यटन विकास, स्मारकाची संकल्पना, निधीची उपलब्धता, जागेची निश्चिती आणि आवश्यक प्रशासकीय मान्यतांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या इतिहासातील वीर योद्ध्यांचा पराक्रम जतन करतानाच ऐतिहासिक पर्यटनालाही चालना मिळावी, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.
'छत्रपती शिवाजी महाराज सृष्टी' प्रकल्पालाही गती
पर्यटन विभागाने बैठकीत माहिती दिली की, ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार प्रतापगडाच्या पायथ्याशी 'छत्रपती शिवाजी महाराज सृष्टी' हा पर्यटन विकास प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या प्रकल्पामध्ये शिवकालीन इतिहासाचे दर्शन घडविणारी शिल्पे, अॅम्फीथिएटर, लाईट अँड साऊंड शो, पर्यटक सुविधा केंद्र, कॅफेटेरिया, प्रदर्शन दालन आणि परिसराचे सुशोभीकरण यांसारख्या विविध कामांचा समावेश आहे.
अर्धाकृतीऐवजी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय
बैठकीत वीर जिवाजी महाले स्मारकासंदर्भातील पूर्वीच्या प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. सुरुवातीला अर्धाकृती पुतळ्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन पूर्णाकृती पुतळा आणि स्वतंत्र स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आवश्यक जागा निश्चित करून निधी उपलब्ध करत काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
'इतिहास जिवंत ठेवणारे प्रेरणास्थान ठरेल'
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या वीर जिवाजी महाले यांच्या शौर्याचा गौरव करणे ही राज्याची जबाबदारी आहे. प्रतापगडावरील हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि स्वराज्याचा इतिहास जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करेल.
प्रतापगड हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र असून, या स्मारकामुळे पर्यटकांना स्वराज्याचा इतिहास अधिक प्रभावीपणे अनुभवता येईल. यामुळे ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक विकासालाही गती मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सदस्य सचिव विजय पोवार, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे उपस्थित होते. तर सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभाग, जलसंपदा विभाग आणि अन्य संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
बैठकीच्या शेवटी संबंधित विभागांनी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून वीर जिवाजी महाले स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशा स्पष्ट सूचना मंत्र्यांनी दिल्या. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि ऐतिहासिक पर्यटनाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!