सातारा नगरपरिषदेला
अत्याधुनिक हायड्रो जेटिंग मशीन
भूमिगत गटारांच्या यांत्रिक स्वच्छतेला गती
स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत मशीनचा शुभारंभ
सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह स्वच्छता व्यवस्थेला बळ
संतोष शिराळे |सातारा
भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत सातारा नगरपरिषदेला अत्याधुनिक हायड्रो जेटिंग मशीन प्राप्त झाले असून, त्याचा शुभारंभ नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या आधुनिक मशीनमुळे शहरातील भूमिगत गटारे, सांडपाणी वाहिन्या, मॅनहोल व चेंबर्सची यांत्रिक पद्धतीने प्रभावी स्वच्छता होणार असून, सातारा शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत शहरांना कचरामुक्त बनविणे, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करणे, स्वच्छता व्यवस्थेचे यांत्रिकीकरण करणे आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे या उद्देशाने अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातारा नगरपरिषदेला हे हायड्रो जेटिंग मशीन प्राप्त झाले आहे.
या मशीनद्वारे उच्च दाबाच्या पाण्याच्या सहाय्याने भूमिगत गटारे व सांडपाणी वाहिन्यांमधील गाळ, कचरा आणि अडथळे प्रभावीपणे दूर करता येणार आहेत. त्यामुळे गटारे तुंबण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून, विशेषतः पावसाळ्यात शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सुरळीत राहणार आहे.
यंत्रसामग्रीच्या वापरामुळे सफाई कर्मचाऱ्यांना गटारात प्रत्यक्ष उतरून काम करण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसह आरोग्याचे संरक्षण होऊन स्वच्छता व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, "स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत प्राप्त झालेले हायड्रो जेटिंग मशीन सातारा शहराच्या स्वच्छता व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याबरोबरच सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी सातारा घडविण्यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील राहील."
शुभारंभ प्रसंगी उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन सभापती अशोक शेडगे, बांधकाम सभापती विनोद खंदारे, नगरसेवक फिरोज पठाण, रविंद्र ढोणे, रविराज किर्दत, सुधाकर यादव, आरोग्य विभाग प्रमुख राकेश गलियन, नितीन माळवे, सुजित जाधव तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!