शेतीपंपाच्या तांब्याच्या
केबल चोरी प्रकरणी
दोन चोरटे जेरबंद
वाठार पोलिसांची धडाकेबाज कारवाई
चोरट्यांकडून तीन गुन्हे उघडकीस
संतोष शिराळे |सातारा
वाठार पोलीस ठाण्याने शेतीपंपांच्या तांब्याच्या केबल चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे 83 हजार रुपये किमतीच्या 960 फूट तांब्याच्या केबल जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे तीन गुन्हे उघडकीस आले असून सहा शेतकऱ्यांच्या चोरी गेलेल्या केबलचा शोध लागला आहे.
देऊर (ता. कोरेगाव) येथील मळवी शिवारात 2 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शेतकरी अजित धनसिंग कदम यांच्या विहिरीवरील सुमारे 70 फूट लांबीची तांब्याची केबल चोरी करत असताना ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य, पोलीस पाटील आणि वाठार पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर वाठार पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी देऊर व तळीये परिसरातील धरणालगत तसेच विहिरीवरील पाणी उपसा पंपांच्या तांब्याच्या केबल चोरीची कबुली दिली. या तपासातून वाठार पोलीस ठाण्यातील एकूण तीन गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपींकडून 83 हजार रुपये किमतीच्या सुमारे 960 फूट तांब्याच्या केबल जप्त केल्या आहेत.
अरुण भरत काळे (वय 19), रा. बावधन नाका, ता. वाई, जि. सातारा, विकास बबन कोळी (वय 27), रा. रेल्वे स्टेशनलगत, ता. कोरेगाव, जि. सातारा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, सहाय्यक फौजदार वाघमारे, काळे, पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे, अमोल कर्णे, सहदेव तुपे, अजय झुंजार, आनंदराव भोसले, सर्जेराव सुळ, धिरज यादव, विवेक शिंदे तसेच पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रतीक देशमुख, आदिक शेलार आणि एकनाथ सरगर यांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अमोल कर्णे, सहदेव तुपे आणि अजय झुंजार करीत आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालमत्तेविषयक गुन्ह्यांबाबत संशयास्पद व्यक्ती किंवा कोणतीही माहिती आढळल्यास ती गोपनीय पद्धतीने पोलिसांना कळवावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी नागरिकांना केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!