भोसे हत्याकांड उघड; पाचगणी पोलिसांकडून २४ तासांत चार जणांना अटक; स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

भोसे हत्याकांड उघड

पाचगणी पोलिसांकडून २४ तासांत चार जणांना अटक

स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

संतोष शिराळे | सातारा

महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे घडलेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी पाचगणी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांच्या आत चार आरोपींना अटक केली आहे. खुनासारख्या गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना न्यायालयासमोर उभे केल्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी भोसे (ता. महाबळेश्वर) येथील अतिथी व्हेज-नॉनव्हेज हॉटेलमध्ये अक्षय रमेश जाधव (वय २७, रा. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) हा आपल्या मित्रांसह मुक्कामी आला होता. रात्री सुमारे १० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान अक्षयने मद्यप्राशन केल्याने त्याचे मित्र त्याला खोलीत ठेवून बाहेरून कडी लावून वरच्या मजल्यावर गेले होते.

काही वेळाने मित्र खोलीत परतले असता अक्षय तेथे आढळून आला नाही. हॉटेलच्या खालच्या बाजूस काही अंतरावर गर्दी झाल्याचे दिसल्याने ते तेथे गेले असता अक्षय गंभीर जखमी अवस्थेत आढळला.

प्राथमिक तपासात, अक्षयने आरोपी सूर्यकांत चंद्रकांत गोळे यांच्या घरात डोकावून पाहिल्याचा राग मनात धरून आरोपींनी त्याला हाताने, लाथाबुक्यांनी तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचे समोर आले. गंभीर जखमी झालेल्या अक्षयला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचगणी येथे आणि त्यानंतर डॉ. बोके हॉस्पिटल, पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मृताचा मित्र विशाल अजित जाधव (वय ३०, रा. बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ९ जुलै २०२६ रोजी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) व ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी सूर्यकांत चंद्रकांत गोळे (वय ३७), रा. भोसे खिंड, ता. महाबळेश्वर, अविनाश सतीश भोसले (वय ३१), रा. बावधन, ता. वाई, राहुल जनार्दन राजपुरे (वय ३७), रा. कणूर, ता. वाई, अमोल गेणदेव वाडकर (वय ३६), रा. चिखली, ता. वाई यांना अटक केली आहे.

गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपींचा शोध घेऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या सात तासांत चारही आरोपींना ताब्यात घेत अटक केली.

आरोपींना १० जुलै २०२६ रोजी महाबळेश्वर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे, संदीप मांढरे, प्रविण कांबळे यांच्यासह पाचगणी पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी संपूर्ण तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments