ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा पुण्यात जाहीर सत्कार


ज्येष्ठ तमाशा कलावंत

पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा

पुण्यात जाहीर सत्कार

पुणे : पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने पुणे येथे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

संगमनेरच्या मातीत जन्मलेल्या रघुवीर खेडकर यांना कला आणि संघर्षाचा वारसा घरातूनच लाभला. त्यांच्या मातोश्री कांताबाई सातारकर या तमाशा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होत्या. लहान वयातच वडील तुकाराम खेडकर यांचे निधन झाल्यानंतर कांताबाईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचा तमाशा फड उभारला. त्याच संस्कारातून घडलेल्या रघुवीर खेडकर यांनी बालवयातच रंगमंचावर पदार्पण केले.

असामान्य अभिनय, हजरजबाबीपणा आणि वैशिष्ट्यपूर्ण विनोदशैलीच्या जोरावर त्यांनी तमाशातील ‘सोंगाड्या’ ही भूमिका अजरामर केली. गण, गवळण, बतावणी आणि वगनाट्य या पारंपरिक तमाशा प्रकारांवर त्यांची विशेष पकड असून त्यांनी तमाशा कलेचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून केला. समाजातील विविध प्रश्न, बदलत्या घडामोडी आणि समकालीन विषयांवर त्यांनी परखड वगनाट्ये लिहून ती धाडसाने रंगमंचावर सादर केली. संघर्षातून उभा राहिलेला हा कलावंत आज तमाशा कलेतील प्रेरणादायी अध्याय ठरला असून, त्यांच्या पद्मश्री सन्मानामुळे लोककलेचा गौरव अधिक उंचावला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी माजी खासदार श्रीनिवास पाटील, प्रा. गणेश चंदनशिवे, उल्हासदादा पवार, मेघराज भोसले, ज्येष्ठ तमाशा कलावंत सुरेखा पुणेकर, रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments