"निरोगी आरोग्यासाठी

योग साधना गरजेची" :

आमदार मनोजदादा घोरपडे

भाजपातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

संतोष शिराळे, सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी (दि. २१ जून) सातारा जिल्हा भाजपा महिला मोर्चा आणि सातारा हिल रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाण पुलाखाली भव्य योगसाधना शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करताना, "निरोगी आरोग्यासाठी योग साधना अत्यावश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे जागतिक महत्त्व जगासमोर मांडले आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त आणि निरोगी राहण्यासाठी योग हाच सर्वोत्तम मार्ग आहे," असे सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे यांनी नागरिकांना दररोज काही वेळ योगासाठी देण्याचे आवाहन करत, "रोज थोडा वेळ योग साधना करून आपले आरोग्य उत्तम ठेवा," असा संदेश दिला.

या शिबिराचे नेतृत्व भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तेजस्विनीताई घोरपडे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, स्वाभिमानी संघटनेच्या अध्यक्षा समता घोरपडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, योग दिन संयोजक गणेश जाधव, सातारा पालिकेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल चिकणे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, नगरसेविका रीना भणगे, नगरसेवक रवी पवार, सातारा बाह्य मंडल अध्यक्षा वैशाली टंगसाळे, वैष्णवी कदम, योग प्रशिक्षक कुंजा खंदारे, सरचिटणीस विक्रम बोराटे, अक्षय भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि निरोगी जीवनातील उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सातारा हिल रनर्सचे संस्थापक डॉ. सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. 

यावेळी सौ. मनीषा घार्गे, सौ. स्वाती ढाणे आणि डॉ. नीलिमा पवार यांनी विविध योगासने आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. मनीषा घार्गे यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिबिरानंतर उपस्थित मान्यवरांनी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करत आपली मनोगते व्यक्त केली. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांनी योगसाधनेचा अनुभव घेतला. "करू योग, राहू निरोग" हा संदेश देत कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण समारोप करण्यात आला.